रत्नागिरीत अजब प्रकार उघडकीस, सर्वसामान्यांकडून ‘चिरमिरी’ घेणारे आता सहकारी अधिकाऱ्यांकडून मागू लागले लाच

सर्वसामान्य नागरिकांची शासकीय कामे करण्यासाठी चिरीमिरी घेणारे शासकीय अधिकारी आता सहकारी अधिकाऱ्यांकडूनही लाच मागत असल्याचे निदर्शनास आले.असा प्रकार रत्नागिरीत घडला असून गोदाम तपासणीचा नकारात्मक अहवाल वरिष्ठांकडे न पाठविण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांने सहकारी अधिकाऱ्याकडून 11 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

संगमेश्वर येथील धान्य गोदामाला जिल्हाधिकारी आणि संगमेश्वर तहसीलदार यांनी 22 मार्च रोजी भेट दिली होती.त्यावेळी तक्रारदार अधिकारी गैरहजर होते.त्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी प्रदीप केदार यांनी गोदामाची तपासणी करून धान्यसाठ्यात तफावत असल्याचे सांगितले.तसेच संबंधित अधिकारी गैरहजर असल्याचे सांगून वरिष्ठ कार्यालयाला नकारात्मक अहवाल न पाठविण्यासाठी केदार यांनी 15 हजार रुपयांची लाच मागितली.तडजोडीनंतर 11 हजाराची लाच प्रदीप केदार याने होकार दिला.त्याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयात सापळा रचला. 11 हजार रूपयांची लाच घेताना जिल्हा पुरवठा अधिकारी प्रदीप केदार ( वर्ग 1) याला रंगेहाथ पकडण्यात आले.हि कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अविनाश पाटील,निरीक्षक मच्छिंद्र जाधव,दीपक आंबेकर,संजय वाघाटे,विशाल नलावडे,राजेश गावकर आणि चांदणे यांनी केली.