रत्नागिरी पोलीसांची धडक कारवाई, ब्राऊन हेरॉईनच्या 154 पुड्या आणि साडेपाच किलो गांजा जप्त

अंमली पदार्थांचा रत्नागिरी जिल्ह्याला विळखा पडला आहे. तरुण पिढी व्यसनाधीन होत चालली आहे. या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देत रत्नागिरी पोलीसांनी अंमली पदार्थांच्या विरोधात धडक कारवाई सुरु केली आहे. नाचणेरोड येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ब्राऊन हेरॉईनच्या 154 पुड्या जप्त केल्या. रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने कोकणनगर ते प्रशांतनगर दरम्यान 5 किलो 55 ग्रॅम वजनाचा गांजा पकडला.

जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी अंमली पदार्थाच्या विरोधात कडक कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस दलाला दिल्या होत्या. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक नितीन ढेरे यांचे पथक गस्त घालत असताना नाचणे रस्ता ते गुरुमळी दरम्यान आडोशाला एक व्यक्ती संशयास्पद हालचाली करताना दिसून आली. चौकशी केली असताना त्या व्यक्तीचे नाव अदनान नाजीममियाँ नाखवा, वय 25 असे त्याने सांगितले. त्याच्या ताब्यातील पिशवी तपासली असता त्यामध्ये ब्राऊन हेरॉईनच्या 154 पुड्या आणि इतर साहित्य सापडले. त्याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, हवालदार शांताराम झोरे, नितीन डोमणे, बाळू पालकर आणि गणेश सावंत यांनी केली.

शहर पोलीसांकडून 5.55 किलो गांजा जप्त

उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईणकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक सतीश शिवरकर आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या अधिकाऱ्यांनी अंमली पदार्थ विकणाऱ्यांचा शोध सुरु केला होता. पोलीस उपनिरीक्षक शाम आरमाळकर हे कोकणनगर ते प्रशांतनगर दरम्यान गस्त घालत असताना एक व्यक्ती संशयास्पद हालचाली करताना आढळली. पोलीसांनी त्याची कसून चौकशी केली असता तो सांगली येथून गांजा घेऊन रत्नागिरीत आला होता. मन्सूरअली निजाम पठाण, वय 40, रा. मिरज-सांगली असे त्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडे 5 किलो 55.5 ग्रॅम वजनाचा गांजा सापडला. पोलीसांनी एकूण 3 लाख 25 हजार 500 रुपयांचा मुददेमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस निरीक्षक सतीश शिवरकर, उपनिरीक्षक शाम आरमाळकर, दीपक साळवी, पंकज पडेलकर, भालचंद्र मयेकर, अमोल भोसले, आशिष भालेकर, कौस्तुभ जाधव, अमित पालवे यांनी केली.