‘आलेली गवर फुलून जाय, माळ्यावर बसून पोळ्या खाय’ असा मुखाने गजर करत हातात पेटत्या मशाली घेऊन ढोल, सनई, टिमकी, खालु, बाजांच्या पारंपरिक वाद्यांच्या ठेक्याच्या तालावर दापोलीकरांनी पारंपरिक पलेत्या नृत्याचा आनंद लुटला. सुदैवाने पावसाने विश्रांती घेतल्याने गावकऱ्यांच्या उत्साह द्विगुणीत झाला.
दापोली तालुक्यातील केळशी या गावात गौरी पूजनाच्या दिवशी रात्री पलेत्या नाचाची परंपरा ही फार पूर्वापारपासून सुरू आहे. पलेत्यांच्या नाचाची परंपरा आजही त्याच श्रद्धेने ग्रामस्थांकडून जोपासली जात आहे. हे केळशी गावाचे एक विशेष आहे.
पेटत्या पलेत्या साहसी नृत्याची परंपरा कायम
केळशी गावातील आळ्या पाखाड्या वाड्यांमधील लोक गौरी पूजनाच्या दिवशी रात्री पांढरे शुभ्र धोतर, सदरा किंवा झब्बा लेंगा आणि डोक्यावर पांढरी शुभ्र गांधी टोपी परीधान करून आपल्या हातात पेटत्या मशाली घेऊन सनई ढोल टिमकी वाद्यांच्या तालावर अगदी शिस्तबद्ध पावंड्यांवर नाचतात. यावेळी आलेली गवर फुलून जाय, माळ्यावर बसून पोळ्या खाय अशाप्रकारे मुखाने सतत गजर करत लोक केळशी ग्रामदैवत श्रीकालभैरवाचे दर्शनासाठी येत असतात.
श्रीकालभैरव मंदिरासमोर आल्यावर तेथे सनई ढोल टिमकीच्या वाद्याच्या ठेक्यावर फेर धरून नाचतात. हाती पेटत्या मशाली प्रत्येकाने जरी घेतलेल्या असल्या तरी दुखापत होणार नाही याची खबरदारी घेत केळशीतील लोक ही परपंरा जपत आलेले आहेत.
घरोघरी पूजा झाल्यानंतर गावात धरतात फेर
श्रीकालभैरव मंदिरासमोर फेर धरून नाचल्यानंतर सर्व आळ्या पाखाड्या वाड्यांमधील लोक आपापल्या आळ्या, वाड्या पाखाडयांमध्ये गौरीसमोर रात्रभर नाचतात. केळशीमधील अनेक घरात गौरी पूजन झालेले असते. या नाचाच्या माध्यमातून सर्वजण भवानीचा गोंधळ घालीत असतात, अशी ही वर्षांनुवर्षाची परंपरा त्याच श्रद्धेने आणि परंपरेने केळशीतील लोक आजपर्यंत जोपासत आले आहेत.