Ratnagiri News – जिंदाल कंपनीने फसवले, अद्यायावत रूग्णालय देतो सांगून ‘ऊर्जा’ नावाच्या दवाखान्यावर बोळवण!

जयगडमध्ये जिंदाल कंपनी सुरू झाली तेव्हा ग्रामस्थांचा विरोध होता. हा विरोध कमी करण्यासाठी जिंदाल कंपनीने अनेक आश्वासने दिली होती. परंतु स्थानिकांना रोजगारापासून रूग्णालयापर्यंत दिलेली आश्वासने हवेत विरली आहे. अद्यायावत रूग्णालय सोडा कंपनीने जो दवाखाना उभारलाय तिथेही आरोग्य सुविधा नाहीत. वायुगळतीची घटना घडली, तेव्हा विद्यार्थ्यांना घेऊन ग्रामस्थांनी रत्नागिरी गाठली. जिंदाल कंपनीने अद्यायावत रूग्णालय देतो सांगून उर्जा नावाच्या दवाखान्यावर बोळवण करून ग्रामस्थांची फसवणूक केली आहे.

गुरूवारी जिंदाल कंपनीत एलपीजी वायुगळती होऊन 68 विद्यार्थी आणि एका महिलेची प्रकृती बिघडली. या विद्यार्थ्यांना श्वसनाचा त्रास सुरू झाला. काहींना चक्कर आली. प्रकृती बिघडलेल्या विद्यार्थ्यांना जिल्हा रूग्णालयात पाठविण्यासाठी जिंदाल कंपनी पुढे आली नाही. विद्यार्थ्यांना रूग्णालयात नेण्यासाठी वाहनांची सुविधा उपल्बध करून दिली नाही. या दुर्घटनेनंतर चौकशीसाठी प्रशासकीय समिती स्थापन करण्यात आली असून कंपनीच्या चार अधिकाऱ्यांवर जयगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कंपनी स्थापन झाल्यापासून स्वत:चे उत्पादन वाढवताना जिंदाल कंपनीला ग्रामस्थांनी दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला. जिंदाल कंपनीत किती स्थानिकांना रोजगार मिळाला हा संशोधनाचा विषय आहे. जिंदाल कंपनी अद्यायावत रूग्णालय उभं करणार होती. हे रूग्णालय कागदावरच राहिले. जिंदालने उर्जा नावाने दवाखाना उभारलाय तिथे आवश्यक आरोग्य सुविधा नाहीत. त्यामुळे दुर्घटना घडल्यावर विद्यार्थ्यांना घेऊन ग्रामस्थांनी रत्नागिरी गाठली. जिंदाल कंपनीने अद्यायावत रूग्णालय देतो सांगून उर्जा नावाच्या दवाखान्यावर बोळवण करून ग्रामस्थांची फसवणूक केली. दुर्घटना घडल्यानंतर उर्जा दवाखान्याचा उपयोग काय? असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केला आहे.