देवगड तालुक्यातील पडेल कॅन्टीन परिसरात चोरीची घटना घडली आहे. चोरट्यांनी तीन दुकाने फोडली असून आठ हजार आठशे रुपयांची रोकड लंपास केली आहे. कष्टाची कमाई चोरीला गेल्यामुळे दुकान मालकांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पडेल कॅन्टीन येथे चोरट्यांनी मंगळवारी (2 जुलै) रात्री तीन दुकाने फोडली. यामध्ये जगदीश सखाराम येंडे यांच्या मालकीचे आशीर्वाद बंगल स्टोअर हे बांगड्यांचे दुकान फोडले आणि दुकानातून 5000 रुपये चोरून नेले. त्यानंतर विशाल पांगरेकर यांच्या सलगर चहाचे दुकान सुद्धा चोरट्यांनी फोडले आणि 1,400 रुपये लंपास केले, तर स्वप्निल कोकरे यांच्या बेकरीचे कुलुप तोडून 2,400 रुपये चोरून नेले. बुधवारी (3 जुलै) सकाळी सहा वाजता हा सर्व प्रकार उघडकीस आला. चोरट्यांनी एकूण 8,000 रुपये चोरून नेले आहेत. त्यानंतर तिन्ही दुकानदारांनी विजयदुर्ग पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोज सोनवलकर, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र जाधव, दशरथ चव्हाण, पोलीस हवालदार प्रशांत जाधव यांनी घटनास्थळाची पाहणी केली. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले असून पुढील तपास पोलीस करत आहेत.