Ratnagiri News 11 फेब्रुवारीपासून 12 वी तर, 21 पासून 10 वीची परीक्षा, भरारी पथकांची परीक्षा केंद्रांवर नजर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.12 वी) दि. 11 फेब्रुवारी ते 18 मार्च व माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.10वी) दिनांक 21 फेब्रुवारी ते दि. 17 मार्च कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील परीक्षा केंद्र असलेल्या शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना भरारी पथके भेट देणार आहेत. ज्या केंद्रांवर गैरमार्गाची प्रकरणे आढळून येतील, त्या केंद्रांची परीक्षा मान्यता पुढील वर्षापासून कायमची रद्द करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समितीचे अध्यक्ष एम देवेंदर सिंह यांनी दिला आहे.

जिल्ह्यातील परीक्षांचे संचलन सुयोग्य व परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार होऊ नयेत यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समिती अध्यक्ष श्री. सिंह यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात घेण्यात आली. या बैठकीस पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, शिक्षणाधिकारी प्राथमिक बी. एम. कासार, शिक्षणाधिकारी योजना किरण लोहार, शिक्षणाधिकारी माध्यमिक सुवर्णा सावंत आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी सिंह म्हणाले, जिल्ह्यातील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र, (इ. 12वी) व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. 10वी) परीक्षा चालू असताना परीक्षा केंद्र परिसरातील 1 कि. मी. च्या आतमधील झेरॉक्सची दुकाने बंद ठेवावीत. जिल्ह्यातील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र, (इ. 12वी) व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. 10वी) परीक्षा केंद्र असलेल्या शाळा / कनिष्ठ महाविद्यालयात वर्ग खोल्यांमध्ये व शालेय आवारात चालू स्थितीतील सीसीटीव्ही कॅमेरे आवश्यक आहेत.

परीक्षा केंद्र असलेल्या शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयात, वर्गखोल्यांमध्ये व शालेय आवारात चालू स्थितीतील सीसीटीव्ही कॅमेरे बसवून 30दिवस बॅकअप राहील याची व्यवस्था करणे किंवा 15 दिवसांनी बॅकअप काढून घेवून जतन करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील सर्व केंद्रांसाठी भरारी पथकांची नियुक्ती करावी. ज्या केंद्रांवर गैरमार्गाची प्रकरणे आढळून येतील त्या परीक्षा केंद्रांची मान्यता पुढील वर्षापासून कायमची रद्द केली जाईल.

जिल्ह्यातील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र, (इ. 12वी) व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. 10वी) परीक्षा केंद्र असलेल्या शाळा / कनिष्ठ महाविद्यालयावर देखरेख ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्‍यांचा वापर करावा. तसेच ड्रोनव्दारे केलेले रेकॉर्डींग जतन करून ठेवावे.

शिक्षणाधिकारी माध्यमिक श्रीमती सावंत यांनी यावेळी माहिती दिली. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) लेखी परीक्षा 11 फेब्रुवारी ते दि. 18 मार्च याकालावधीत होत आहे. जिल्ह्यात 38 परीक्षा केंद्रांवर 16 हजार 54 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.10वी) लेखी परीक्षा-दिनांक 21 फेब्रुवारी ते दि. 17 मार्च या कालावधीत होत आहे. जिल्ह्यात 73 परीक्षा केंद्रांवर 18 हजार 388 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. जिल्ह्यातील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र, (इ. 12वी) व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. 10वी) परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी, 13 परिरक्षक कार्यालय आहेत.