
राष्ट्रीय स्वयंसंघाचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी काही दिवसांपूर्वी मराठी भाषेबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्याबाबत त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भात जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांना सोमवारी (10 मार्च) निवेदन देण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून दिलेल्या निवेदनात ही मागणी केली.
काही महिन्यांपूर्वी केंद्र शासनाने मराठी भाषिकांच्या भावनांचा आदर राखून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जाहीर केला. त्याबद्दल आम्ही यापूर्वी अनेकदा केंद्र शासन आणि राज्य सरकारचे अभिनंदन केले आहे. याबाबत संपूर्ण महाराष्ट्र आनंदोत्सव साजरा करत असतानाच त्या आनंदावर पांघरुण घालण्याचे पाप काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसंघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी केले असल्याचे अनेक वर्तमानपत्रे, प्रसार माध्यमे यांच्या माध्यमातून समजले. त्याच बातम्यांच्या आधारे असे समजले की, त्यांनी एका कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याच्या राजधानीत म्हणजे मुंबईत येऊन मराठी भाषेबद्दल अत्यंत बेजबाबदारपणे मराठी भाषा आणि मराठी जनांबद्दल अवमानकारक बोलून महाराष्ट्राचा अपमान केला आहे. हा अपमान संपूर्ण महाराष्ट्राचा आणि मराठी अस्मितेचा असून त्याबद्दल आमच्या तीव्र भावनेतून आम्ही त्यांचा निषेध करीत आहोत. हा अवमान केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाने भैय्याजी जोशी यांच्यावर योग्य ती कारवाई करावी,” अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी जिल्हा समन्वयक संजय पुनसकर, तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, रत्नागिरी शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, शहर संघटक प्रसाद सावंत, विभाग प्रमुख सलिल डाफळे, अमित खडसोडे, प्रशांत सुर्वे, उपविभाग प्रमुख दिलावर गोदड, माजी नगरसेविका रशीदा गोदड, साजिद पावसकर, हिना दळवी, नितिन तळेकर, राजाराम रहाटे, बाबू बंदरकर आदी उपस्थित होते.