![Dapoli](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/Dapoli-696x447.jpg)
वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असलेला आंजर्ले-मुर्डी मार्गे हर्णे दापोलीकडे जाणाऱ्या रस्त्यात ठिकठिकाणी खड्डे पडून रस्त्याची झालेली दुरवस्था वाहतुकीस अडचणीची ठरत आहे. शिवाय आंजर्ले व मुर्डी या दोन गावांना जोडणाऱ्या रस्त्यातील पुलाच्या खालील बाजूचा सिमेंट स्लॅब कोसळून पडला असल्याने त्यातून लोखंडी शिगा बाहेर पडल्या आहेत. खाऱ्या हवेच्या वाफेने पुर्णपणे गंजून गेलेल्या लोखंडी शिगांचा पुलाला असलेला आधारच कमकुवत झाल्याने पुल कोसळण्याचा धोका वाढला आहे.
स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार याबाबत ग्रामसभेत विषय पटलावर घेऊन सबंधित बांधकाम विभागाकडे लेखी कळवण्यात आले होते. परंतु ना रस्त्यातील खड्डे बुजवले गेले, ना पुलाच्या दुरूस्तीसाठी काही हालचाल झाली. त्यामुळे भविष्यात पुल कोसळून खाली पडला तर या मार्गावरील वाहतुकच पुर्णपणे बंद पडण्याची नामुष्की ओढवणार आहे. त्याची सर्व जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागालाच घ्यावी लागेल कारण ही समस्या केवळ आंजर्ले मुर्डी या दोन गावापुरती मर्यादित नाही, तर अनेक गावातील रहिवाशांना वाहतुकीसाठी या मार्गाचा उपयोग होत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने ही महत्त्वाची समस्या निकालात काढण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.