
दापोली शहरातील रस्त्याची झालेली दुरावस्था ही एखाद्याचा नाहक बळी घेतल्यावरच सुधारणा करण्यात येणार आहे का ? अशा प्रकारच्या संतप्त प्रतिक्रिया शहर वासीयांकडून उमटत आहेत. दापोली तालुक्याचे मुख्यालय असलेल्या दापोली शहरातील रस्त्यावरून केवळ दापोली शहरातीलच नागरिक प्रवास करतात असे नाही तर तालुक्याच्या ग्रामीण भागातून दापोलीत कामानिमित्त येणाऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय येथे पर्यटनासाठी येणाऱ्यांनाही रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे.
दापोलीत व्यापारी बाजार पेठ आहे. येथे कृषी विद्यापीठ असल्याने राज्यभरातील शेतकरी येथील संशोधक शेतीविषयक विविध पिकांची माहिती घेण्यासाठी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षणासाठी दापोलीत येत असतात. दापोलीत विविध प्रकारची शासकीय कार्यालये असल्याने दापोलीत अगदी मंडणगडपासून ते दापोलीतील ग्रामीण भागातील लोक हे आपल्या कामानिमित्त दापोलीत नेहमीच येत असतात. तसेच किराणा, भाजीपालासह शेतीविषयक औजारे खरेदीसाठी, बांधकामविषय साहित्य खरेदीसाठी आदी विविध कामांसाठी दापोली शहराशिवाय येथील लोकांना दुसरा पर्याय नसतो.
तसेच येथे नेहमीचीच पर्यटकांची वर्दळ पाहता दापोली मंडणगड मार्गावरील दापोली शहराच्या प्रवेशद्वारावरच रस्त्याची झालेली दुरावस्था ही लोकप्रतिनिधींसह प्रशासनाला मान खाली घालायला लावणारी अशीच बाब आहे. खड्यांच्या रस्त्याची सुधारणा करून रस्ते मोकळा श्वास कधी घेणार हा प्रश्न पडला आहे. या रस्त्यावर बळी जाण्याची वाट न पाहता एक सामाजिक दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून किमान सामाजिक बांधिलकीच्या नात्याने तरी रस्त्याची सुधारणा करून रस्ता वाहतूक योग्य करावा अशा प्रकारच्या मागणीने जोर धरला आहे.