
राजापूरची शांतता आणि जातीय सलोख्याची परंपरा कायम राखण्याची आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. घडलेल्या घटनांप्रकरणी पोलीस प्रशासन योग्यप्रकारे चौकशी करून कायदेशीर प्रक्रिया अवलंबून कार्यवाही करत आहे. मात्र, तरीही सर्वांनी समाजातील एक प्रमुख घटक म्हणून पुढाकार घेत दोन्ही समाजात कशा प्रकारे एकोपा टिकून राहिल यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन तहसीलदार विकास गंबरे यांनी केले. यावेळी त्यांनी सोशल मिडीयावरून कुणीही चुकीच्या आणि समाजात तेढ निर्माण करणार्या पोस्ट व्हायरल करू नयेत अशा सूचनाही केल्या.
दोन दिवसांपूर्वी शहरामध्ये घडलेला वाद आणि भविष्यात येणारे सण या अनुषंगाने तहसीलदार विकास गंबरे यांनी शनिवारी (15 मार्च 2025) तालुका शांतता समितीची बैठक आयोजित केली होती. यावेळी उपविभागिय पोलीस अधिकारी यशवंत केडगे, राजापूर पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांच्यासह राजापूर तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर, माजी नगराध्यक्ष अॅड. जमिर खलिफे, जयप्रकाश नार्वेकर, लियाकत काझी, सुलतान ठाकूर, महादेव गोठणकर, आजिम जैतापकर, हुसैन मुंगी, मधुकर पवार, विनय गुरव, राजापूर अर्बन बँक अध्यक्ष संजय ओगले, राजापुरातील मुस्लीम समाज पाच मोहल्ला समिती अध्यक्ष शौकत नाखवा, अनिल कुडाळी, सुभाष पवार, सुरेंद्र तांबे, प्रसन्न मालपेकर, विजय हिवाळकर, लियाकत काजी, आदीसह व्यापारी, नागरिक आणि शांतता समिती सदस्य उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना गंबरे यांनी सोशल मिडीयावर चुकीचे मेसेज आणि व्हिडीओ व्हायरल होत असल्याकडे सार्यांचे लक्ष वेधताना या सार्याला एक जागरूक नागरिक म्हणून आपण सार्यांनी पायबंद घालणे गरजेचे असल्याचे मत मांडले. आगामी काळात येणारे सण, उत्सव सर्वांनी शांततेमध्ये साजरे करताना प्रशासनाच्या सुचनांचे पालन करण्याचे आवाहन केले. यावेळी बोलताना उपविभागिय पोलीस अधिकारी यशवंत केडगे यांनी देखील शांततेचे आवाहन केले व कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपण थेट पोलीसांशी संपर्क साधावा, असे आवाहन केले.