रत्नागिरी जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 143 डेंग्युचे रुग्ण सापडले आहेत. डेंग्युच्या रुग्णांची संख्या वाढल्यानंतर रत्नागिरी नगरपरिषदेने डास प्रतिबंधक फवारणीला सुरुवात केली आहे. तसेच जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने ठिकठिकाणी जनजागृती करण्यात येत आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयात दिवसेंदिवस डेंग्युच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत जिल्हा रुग्णालयात 127 डेंग्युचे रुग्ण उपचार घेत आहेत, तर नव्याने 143 रुग्ण सापडले आहेत. डेंग्युच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने जनजागृती मोहिम हाती घेतली आहे. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळण्याचे आवाहन आरोग्य विभागाने नागरिकांना केले आहे. रत्नागिरी नगरपरिषदेकडून शहरात डास निर्मुलनासाठी फवारणी करण्यात येत आहे. डेंग्युबाबत जनजागृती करणारे बॅनर्स शहरात लावण्यात आले आहेत. तसेच 28 आशा कार्यकर्त्या घरोघरी जाऊन डेंग्युच्या आजाराबाबत जनजागृती करणार आहेत.