दापोली मतदार संघाला ताकद देणार, आमदार भास्कर जाधव यांचा निर्धार

दापोली मतदारसंघ हा आपल्याला काही नवीन नाही. त्यामुळे तुम्ही खचून जावू नका पूर्ण ताकदीने संघटन बांधू आणि पुन्हा दापोली विधानसभा मतदार संघावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा भगवा झेंडा फडकावूनच दाखवू असा निर्धार आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केला. दापोली शिवसेना पदाधिकारी यांच्याशी संवाद साधताना भास्कर जाधव बोलत होते.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आमदार भास्कर जाधव यांची महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदी शिफारस करून त्यांच्याप्रती विश्वास व्यक्त करत एक मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपवली आहे. आमदार भास्कर जाधव यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दाखवलेल्या विश्वासास आमदार भास्कर जाधव हे निश्चितपणे यशस्वी ठरतील. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदार भास्कर जाधव यांच्या प्रती दाखवलेल्या विश्वासाचे अभिनंदन आणि पुढील कारकिर्दीस शुभेच्छा देण्यासाठी दापोली विधानसभा क्षेत्र प्रमुख मुजीब रूमाने, शिवसेना जिल्हा सरचिटणीस अनिल जाधव, तालुका प्रमुख ऋषीकेश गुजर, तालुका सरचिटणीस नरेंद्र करमरकर, दापोली शिवसेना शहर प्रमुख आणि नगरसेवक संदिप चव्हाण आदींनी आम. भास्कर जाधव यांची प्रत्यक्ष भेट घेत शुभेच्छा दिल्या.

यावेळी आमदार भास्कर जाधव यांनी सद्यस्थितीत दापोली मतदार संघात सुरू असलेल्या घडामोंडीवर बारीक लक्ष असल्याचे शिवसैनिकांना सांगितले. तुम्ही अजिबात मागे हटू नका, आपल्या मनासारखंच होईल, तुमच्या दापोली मतदार संघात आपण विशेष लक्ष घालू आणि प्रस्थापितांची मक्तेदारी मोडून दापोली मतदार संघावर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा डौलाने फडकावूनच दाखवू, असा विश्वास भास्कर जाधव यांनी बोलताना व्यक्त केला. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी दापोली मतदार संघात मी स्वतः लक्ष घालेन, त्यासाठी लवकरच मी दापोली, मंडणगड, खेडचा दौरा करेन असेही त्यांनी यावेळी सांगितले.