Ratnagiri News : ग्रामस्थांच्या लढ्याला अखेर यश; शेवरे, आतले वडवली मार्गे मुंबई एस.टी.बस सुरू

मंडणगड तालूक्यातील शेवरे, आतले आणि वडवली येथील ग्रामस्थांनी एस.टी.आगार मंडणगड यांच्याकडे मुंबईकडे जाण्यासाठी केलेली एस.टी. बस फेरीची मागणी अखेर पूर्ण झाली. शुक्रवारी 12 जुलै 2024 पासून चिंचघर, शेवरे, आतले वडवली देव्हारे मंडणगड मार्गे मुंबई ते बोरीवली एस.टी.बस फेरी सुरू झाली. पहिल्याच दिवशी एस.टी. बस फेरीचे येथील ग्रामस्थांनी दणक्यात स्वागत केले.

मंडणगड तालूक्यातील शेवरे, आतले आणि वडवली या गावांना मुंबईकडे जाण्यासाठी एस.टी. बसची सुविधा उपलब्ध नव्हती. त्यामुळे शेवरे येथील प्रवाशांना चिंचघर येथे, तर आतले वडवली येथील प्रवाशांना देव्हारे येथे खाजगी वाहनाने जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. रिक्षा, ट्रॅक्स, टमटम आदी प्रवासी वाहतुक करणाऱ्या खाजगी वाहनांना अतिरिक्त भाडे देऊन प्रवास करावा लागत होता. त्यामुळे वडवली आतले, शेवरे मार्गावरून मुंबईकडे जाणारी एस.टी. बसची सुविधा सुरू करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी स्थानिक लोक प्रतिनिधी तसेच मंडणगड आगार व्यवस्थापक यांच्याकडे लावून धरली होती. या ग्रामस्थांच्या मागणीला अखेर यश आले आणि या मार्गावर शुक्रवार 12 जुलैपासून बोरथळ, शेवरे, आतले वडवली, देव्हारे मंडणगड मार्गे मुंबई (बोरीवली)ला जाणाऱ्या एस.टी.बस फेरीला सुरुवात झाली. यावेळी ग्रामस्थांनी एस.टी. बसच्या वाहक चालक यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.