मंडणगड एसटी डेपो दुर्गंधीच्या विळख्यात; स्वच्छता गृहाच्या साफसफाईचा आगार व्यवस्थापनाला विसर

मंडणगड शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या एसटी डेपोच्या आवारातील स्वच्छतागृहातील अस्वच्छतेमुळे सगळीकडे दुर्गंधी पसरली आहे. स्वच्छतागृहात ड्रेनेज लाईनचा अभाव असल्याने स्वच्छतागृहातील टाकीतच मलमूत्र साठून राहत असल्याने बस स्टॅण्डच्या आवारात दुर्गंधी पसरली आहे. मंडणगड एसटी आगार प्रशासन मल नि:सारण व्यवस्थेकडे दुर्लक्ष करत आहे.

मंडणगड तालुक्याचे ठिकाण असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे एसटी डेपो येथे आहे. यामुळे तालुक्यातील प्रवाशांसह अन्य तालुक्यातील प्रवासी आणि लांब पल्ल्याच्या एसटी प्रवाशांचीही ये-जा असते.

स्वच्छतागृहाच्या बाहेरील दुर्गंधीमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भाव होण्याचा संभाव्य धोका आहे. असे असताना देखील एसटी प्रशासन प्रवाशांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाची समस्या सोडविण्यासाठी अजिबात लक्ष देत नाही. यावरुन प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची विकासाप्रती असलेली उदासीनता स्पष्टपणे दिसत आहे.