‘ईव्हीएम हटाव, देश बचाव’ असा नारा देत आज महाविकास आघाडीने रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन छेडले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएममध्ये गडबड करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा बॅलेट पेपरवरती निवडणूका घ्या अशी मागणी महाविकास आघाडीकडून करण्यात आली.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि भाजपने मिळवलेल्या विजयानंतर ईव्हीएमबाबत शंका निर्माण झाली. ईव्हीएम घोटाळा करून भाजप पुन्हा सत्तेवर आला असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात ईव्हीएमच्या विरोधात पडसाद उमटत आहेत.
रत्नागिरीमध्येही महाविकास आघाडीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन छेडले. ‘ईव्हीएम हटाव, देश बचाव’ असा नारा यावेळी देण्यात आता. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम घोटाळा झाला आहे. आता ईव्हीएमवर कोणाचा विश्वास नाही, त्यामुळे निवडणुका बॅलेट पेपरवरच घ्याव्या अशी आमची मागणी असल्याचे यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा समन्वयक संजय पुनसकर यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बने, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सू आर्ते, कॉंग्रेसचे अशोक जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांचे रत्नागिरी तालुकाध्यक्ष राजन सुर्वे, माजी नगरसेवक नितीन तळेकर, साजीद पावसकर, अमित खडसोडे, माजी उपसभापती छोट्या गवाणकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.