Ratnagiri News – गांजा आहे का? असं म्हणत वकिलावर प्राणघातक हल्ला,  तीन अज्ञात इसमांकडून बेदम मारहाण

मांडवी समुद्र किनाऱ्यावर एका वकिलावर तिघा अनोळखी व्यक्तींनी हल्ला करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री घडली आहे. या प्रकरणी फिर्यादी कल्पेश रविंद्र जाधव यांनी रत्नागिरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वकील जाधव आपल्या दुचाकीवर मांडवी समुद्र किनारी बसले होते. त्यावेळी तीन अनोळखी व्यक्तींनी त्यांना ‘गांजा आहे का?’ अशी त्रास देण्याच्या हेतूने विचारणा केली व ॲड. जाधव बेसावध असताना त्यापैकी एकाने त्यांची मान दाबून ढोपराखाली दाबण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या तोंडात वाळू कोंबली, तर दुसऱ्याने हेल्मेटने त्यांच्या डोक्यावर मारहाण केली. तिघांनी मिळून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्यांच्या दुचाकीचेही नुकसान केले.
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. हेड कॉन्स्टेबल जितेंद्र दिनकर पालांडे हे तपास करत आहेत. भारतीय न्याय संहिता (बी. एन. एस), 2023 अधिनियम कलम 118 (1), 115 (2), 125, 324 (4), 352, 3 (5) नुसार रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.