
ग्रामदैवत श्री देव भैरी देवस्थान आणि पतितपावन मंदिर संस्था आयोजित गुढीपाडव्यानिमित्त स्वागतयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात्रेचे यंदा 21 वे वर्ष होते. यावेळी वातावरण भगवेमय झाले होते. ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या, भगव्या पताका, सजावट, पारंपरिक वेशभूषेत हिंदू बंधू-भगिनी सहभागी झाले. यात्रेत 50 हून अधिक चित्ररथ सहभागी झाले होते.
सकाळी 9 वाजता श्री देव भैरी जुगाई नवलाई पावणाई, तृणबिंदूकेश्वर संस्था, श्री पतितपावन मंदिर संस्थेच्या वतीने ग्रामदेवता मंदिर ते समाजमंदिरापर्यंत स्वागतयात्रेला सुरवात झाली. शहरातील मारुती मंदिर येथूनही चित्ररथ निघाले. दोन्ही यात्रा जयस्तंभ येथे एकत्रित झाल्या. मार्गावर दुभाजकावर गुढ्या व भगवे ध्वज उभारण्यात आल्या होत्या. यात्रेची समाप्ती श्री पतितपावन मंदिर येथे झाली. त्यावेळी हिंदुत्वाची शपथ घेण्यात आली.
यात्रेमध्ये विविध प्रकारचे चित्ररथ सजवण्यात आले होते. यावेळी भव्य रूपातला श्री हनुमान सर्वात लक्षवेधी ठरला. त्याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा केलेला वध हा सजीव देखावा लक्षवेधी ठरला. विविध संघटनांच्या चित्ररथांचा या स्वागत यात्रेमध्ये समावेश होता.