
सर्वांमुखी जगदंबेचा उदो उदो…. , भले गो भाई अशा प्रकारचा जयघोष करत केळशी येथील श्री महालक्ष्मीच्या रथोत्सवाची मिरवणूक परंपरेनुसार शनिवारी हनुमान जयंतीच्या दिवशी काढण्यात आली. या रथोत्सव मिरवणुकीला भाविक भक्तगणांचा मिळालेला उदंड प्रतिसाद हा क्षणाक्षणाला भक्तगणांच्या उत्साहाची रंगत वाढविणारा असाच होता.
दापोली तालुक्यातील केळशी येथे श्री महालक्ष्मीचे सुप्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरात दरवर्षी हनुमान जयंतीला सर्वात मोठा उत्सव असतो. या उत्सवासाठी चाकरमानी आवर्जून उपस्थित असतात. महालक्ष्मी देवीचा रथोत्सव हे येथील खास वैशिष्ट्य आहे.
उत्सव काळात गोंधळ, कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या दिवशी देवीच्या दरबारात भालदार, चोपदार येतात. ते सुंदर बयाणे म्हणतात. त्यानंतर विडे वाटणी होते. मुख्य यात्रेच्या दिवशी देवीची रथातून भव्य मिरवणूक निघते. रथ मिरवणुकीतील देवी पळविणे, रथ मिरवणुकीतील रेटा रेटी हे सारे दृष्य पाहण्यासारखे असते. यावेळी सर्व लोकांना भुईमुगाच्या शेंगाचा प्रसाद दिला जातो.