Ratnagiri News – रत्नागिरी बाजारपेठेची ओळख असलेली भाजी मार्केटची ब्रिटिश कालीन इमारत जमीनदोस्त

रत्नागिरी शहरातील बाजारपेठेची ओळख असणारे ब्रिटिशकालीन जुने भाजी मार्केट अखेर रत्नागिरी नगर परिषदेने जमीनदोस्त केले. याच ठिकाणी आता नवीन भाजी मार्केट उभारण्यात येणार आहे.

अनेक वर्षापूर्वी रत्नागिरी शहरातील बाजारपेठेत हे भाजी मार्केट उभारण्यात आले होते. ही इमारत ब्रिटिशकालीन आहे. त्यावेळी शहरात अन्य कुठेही भाजी मार्केट नव्हते. रत्नागिरी शहरातील आणि आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ रत्नागिरी शहरातील मुख्य बाजारपेठेतील भाजी मार्केटमध्ये येत असतं. मुख्य बाजारपेठेतील भाजी मार्केट ही रत्नागिरी शहराची ओळख होती. या भाजी मार्केटमध्ये एक लोणचे विक्रीचे दुकान होते. त्यामध्ये विविध प्रकराची लोणची मिळत होती. काही वर्षांनंतर थिएटरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या शेजारी नगरपरिषदेने नवीन भाजी मार्केट सुरू केले. गेल्या चार-पाच वर्षात शहरात भाजीपाल्याची ठिकठिकाणी दुकाने सुरू झाली. कर्लेकरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या मागे नवीन भाजी मंडई निर्माण झाली आहे.

गेल्या काही वर्षात जुन्या भाजी मार्केटची इमारत मोडकळीला आली होती. इमारत धोकादायक झाल्याने मार्केट मधील भाजी विक्रेते रस्त्यावर येऊन बसू लागले होते .जुन्या भाजी मार्केटची इमारत धोकादायक झाल्याची नोटीस भाजी विक्रेत्यांना नगरपरिषदेने दिली होती. मात्र भाजी विक्रेते इमारतीतून बाहेर पडण्यास तयार नव्हते. अखेर त्या भाजी विक्रेत्यांना इमारतीतून बाहेर काढण्यात नगरपरिषदेला यश आले. नगरपरिषदेने जुने भाजी मार्केट पाडून टाकले. आता या जागेवर नवीन भाजी मार्केट उभारण्यात येणार आहे.