
दोन चार लोकांनी शिवसेनेतून इकडून तिकडे उड्या मारल्या याचा अर्थ शिवसेना संपली असा अजिबात होत नाही. तो त्यांचा आणि ते ज्या पक्षात जाणार आहेत, त्या पक्षाचा तो गोड समज आहे, असे शिवसेना उपनेते अमोल किर्तीकर यांनी शिवसेनेशी पंगा घेणाऱ्यांना दापोलीत बोलताना ठणकावून सांगितले.
हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या विचारानेच पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे हे शिवसेना पक्षाला पुढे नेण्याचे प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य उद्धव ठाकरे हेच आपल्या राज्याला प्रगतीपथावर नेण्याचे काम करु शकतात. हे कटू सत्य सहन न होणारे देश आणि राज्याच्या हिताचा विचार सोडून केवळ स्वार्थासाठी स्वहित जपण्यासाठी जर आपल्यातील कोणी इकडून तिकडे उड्या मारल्या असतील वा मारणार असले म्हणून काही शिवसेना पक्ष संपणार नाही.
शिवसेना हा पक्ष शिवसैनिकांच्या मेहनतीवर भक्कमपणे उभा आहे. त्यामुळे शिवसेना संपली असे जर कोणाला वाटत असेल तर आगामी प्रत्येक निवडणुकीत अशांना शिवसेनेचे अस्तित्व दाखवूच असे शिवसेना उपनेते अमोल किर्तीकर यांनी दापोली शिवसेना संपर्क कार्यालयात शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांना संबोधित करताना ठणकावून सांगितले.
शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि युवासेना राष्ट्रीय सरचिटणीस अमोल किर्तीकर यांनी दापोली शिवसेना संपर्क कार्यालयात शिवसेना पदाधिकारी तसेच शिवसैनिकांनी संवाद साधला. यावेळी शिवसेना दापोली तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर, सरचिटणीस नरेंद्र करमरकर, शिवसेना महिला आघाडी उपजिल्हा संघटक मानसी विचारे, नगराध्यक्षा ममता मोरे, शहर प्रमुख संदिप चव्हाण, विभाग प्रमुख शैलेश पांगत, रमेश बहिरमकर, रत्ना बहिरमकर, प्रकाश मयेकर, सिंधु भाटकर, आयुब मसुरकर, प्रसाद कळसकर, निखिल आडविलकर, युवासेना उप जिल्हा अधिकारी गणेश बिल्लार, शिवसेनेचे रघुनाथ पोस्टुरे आदी दापोली मंडणगड येथील पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा पराभव झाल्यानंतर खऱ्या अर्थाने आपण या मतदारसंघात लक्ष घातले. त्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकला असे किर्तीकर म्हणाले. ज्यांनी आत्मविश्वास गमावला आहे असे काही जण हे पक्ष सोडून गेले तर काही जण जात आहेत, जाणार आहेत. अशांच्या पक्ष सोडून जाण्याने शिवसेना कधीही संपणार नाही, कारण शिवसेना पक्षाची खरी ताकद हे शिवसैनिक आहेत. मी जरी मुंबईत कार्यरत असलो तरी शिवसेनेचा उपनेता आहे. त्यात दापोली येथील शिर्दे येथे आपले गाव आहे. त्यामुळे मी व्यक्तिशः आणि सर्व शिवसेना पदाधिकारी नेते यांचे मार्गदर्शन घेऊन तसेच स्थानिक पदाधिकारी तसेच शिवसैनिकांना सोबत घेऊन सर्वांच्या साथीने आपण पुन्हा हा मतदारसंघ बांधू आणि पुनश्च या मतदार संघावर शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचाच भगवा झेंडा फडकवून दाखवू, असा विश्वास त्यांनी शिवसैनिकांना दिला.
दापोली विधानसभा मतदार संघातील दापोली, मंडणगड आणि खेड तालुक्यातील जिल्हा परिषद गटनिहाय दौराही त्यांनी जाहीर केला. याचा शुभारंभ शिवजयंती दिवशी 17 मार्चपासून होत असून, दापोली शिवसेना संपर्क कार्यालयात शिवजयंती उत्सवानिमित्त सत्यनारायण महापूजा, महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाने तसेच ढोल पथकाच्या सलामीने होत आहे. हे शिवसेनेच्या उभारीसाठी शिवसेना उपनेते अमोल किर्तीकर यांनी उचललेले पहिले पाऊल आहे. या निर्णयामुळे शिवसैनिकांमध्ये पुन्हा एकदा जोश निर्माण झाला आहे.