आठवीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात चुकीचा इतिहास छापल्याच्या विरोधात रत्नागिरीत आमरण उपोषण

इयत्ता आठवीच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या इतिहासाच्या पुस्तकात रत्नागिरीतील पतितपावन मंदिर स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांनी बांधले असा चुकीचा इतिहास सांगण्यात आला आहे. या पाठ्यपुस्तकातील या पाठात बदल करून पतितपावन मंदिर दानशूर भागोजीशेठ कीर यांनी बांधले असा उल्लेख करावा अशी मागणी रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाने एक वर्षांपूर्वी केली होती. मात्र अद्यापही पाठ्यपुस्तकात बदल न केल्यामुळे रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाने आज प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. याशिवाय काही नागरिकांनीही अन्यायाविरोधात आवाज उठवत आज प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केले.

रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाचे अध्यक्ष राजीव कीर यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण छेडण्यात आले. या उपोषणाला भारतीय मजदूर संघ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पाठिंबा दिला आहे.

राजीव कीर यांनी सांगितले की, पतितपावन मंदिर हे स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्या सूचनेवरून भागोजीशेठ कीर यांनी स्वखर्चातून बांधले. त्याचा उल्लेखही पतितपावन मंदिरातील शीलालेखावर करण्यात आला आहे. 1931 मध्ये पतितपावन मंदिराच्या उभारणीपासून दिवाबत्ती आणि देखभालीसाठी भागोजीशेठ कीर हे 1500 रूपये देत असत. भागोजीशेठ कीर यांनी केलेल्या खर्चाचा 1933 सालच्या भागोजी बाळोजी कीर चॅरिटेबल ट्रस्टच्या ऑडिट रिपोर्टमध्ये उल्लेख करण्यात आला आहे.