मिंधेगटाच्या संपर्क कार्यालयाचा फलक हटवून तिथे किरण सामंत संपर्क कार्यालयाचा फलक लावला

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून महायुतीची उमेदवारी किरण सामंत यांना न मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली होती. आता त्या नाराजीचे पडसाद उमटू लागले आहेत. किरण सामंत यांच्या सन्मित्रनगर येथील कार्यालयातील उद्योगमंत्री उदय सामंत यांचे छायाचित्र हटवण्यात आले. त्याचबरोबर मारुतीमंदिर येथे शिंदेगटाचे जे जिल्हा संपर्क कार्यालय होते, ते कार्यालय आता किरण सामंत संपर्क कार्यालय करण्यात आले आहे. या सर्व घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नाक्यानाक्यावर उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून मिंधेगटाचे किरण सामंत इच्छुक होते. उद्योगमंत्री उदय सामंत यांचे थोरले बंधु असल्यामुळे त्यांच्या राजकीय वजनाचा फायदा होऊन महायुतीची उमेदवारी किरण सामंत यांना मिळेल अशी आशा होती. मात्र या मतदार संघावर भाजपने दावा केला आणि अखेर तो मतदार संघ बळकावला. किरण सामंत यांनी या मतदार संघावर दावेदारी केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता. मात्र उमेदवारी न मिळाल्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले. त्यापाठोपाठ किरण सामंतही नाराज झाले.

या नाराजीचे पडसाद आता उमटू लागले आहेत. किरण सामंत यांच्या सन्मित्रनगर येथील कार्यालयातील उद्योगमंत्री उदय सामंत यांचे छायाचित्र हटवण्यात आले आहेत. त्याचबरोबर मारुतीमंदिर येथील मिंधेगटाच्या संपर्क कार्यालयाचा फलक काढून त्यावर किरण सामंत संपर्क कार्यालय असा फलक लावण्यात आला आहे. या फलकावर ग्रीनशेड टाकण्यात आली आहे. या फलकावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे, एकनाथ शिंदे आणि किरण सामंत यांचे छायाचित्र लावण्यात आले आहे. उदय सामंत यांचे छायाचित्र लावण्यात न आल्यामुळेही तर्कवितर्क लढवले गेले आहेत.