शिक्षण विभागाने जिंदाल कंपनीवर गुन्हा दाखल का केला नाही? शिवसेनेचा सवाल, शिक्षणाधिकाऱ्यांची घेतली भेट

जिंदाल पोर्ट कंपनीमध्ये झालेल्या वायूगळतीनंतर माध्यमिक शिक्षण विभागानेही गांभीर्याने पावले उचलावीत. विद्यार्थ्यांच्या जिवीताला धोका उद्भवल्यामुळे माध्यमिक शिक्षण विभागानेही जिंदाल पोर्ट कंपनीवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांच्याकडे करण्यात आली.

जिंदाल पोर्ट कंपनीत 12 डिसेंबर रोजी एलपीजी वायूगळती होऊन शेजारी असलेल्या माध्यमिक विद्यामंदिरातील 68 विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली. या विद्यार्थ्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. मात्र पुन्हा दोन दिवसांनी त्यांची प्रकृती बिघडली. 37 विद्यार्थ्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्या सर्व विद्यार्थ्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

आज शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिष्टमंडळाने माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांची भेट घेतली आणि विद्यार्थ्यांच्या जिवीताला धोका निर्माण झाला असताना माध्यमिक शिक्षण विभागाने जिंदाल कंपनीवर गुन्हा का दाखल केला नाही? असा जाब विचारला. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये समुपदेशन करण्याची गरज आहे. त्याकरीता डॉक्टर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना बोलावून समुपदेशन करा. भविष्यात विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी कोण घेणार, असा सवालही शिवसेनेने उपस्थित केला. यावेळी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा समन्वयक संजय पुनसकर, विभागप्रमुख अमित खडसोडे, शकील मालदारर, पुजा जाधव उपस्थित होते.