रत्नागिरीकरांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न, रस्त्यांवरून संतप्त नागरिकांच्या सभेत मिंध्यांची दादागिरी

रत्नागिरी शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवरून संतप्त नागरिकांनी आज रविवारी ‘मी रत्नागिरीकर’ या नावाने सभा आयोजित केली होती. ही सभा मिंधे गटाला झोंबल्यामुळे आज सभेच्या ठिकाणी जाऊन शिंदे गटाने नागरिकांसोबत दादागिरी करत सभा उधळण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. नागरिकांचाच आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्यची टीका नागरिकांनी केली.

मारूती मंदिर येथील विवा एक्सुकेटिव्ह या हॉटेल मध्ये आज मी रत्नागिरीकर या नावाने नागरिकांची सभा आयोजित केली होती. रत्नागिरीतील रस्ते पहिल्या पावसातच वाहून गेल्यानंतर रस्त्यावर खड्डे आणि डांबरापासून विभक्त झालेल्या खडीचे साम्राज्य होते. या खड्डेमय रस्त्यावरून अनेक वाहन चालकांचे अपघात झाले. खड्डेमय रस्त्यावरून संतापलेले नागरिक आज एकत्र येऊन विचारविनिमय करणार होते. मात्र उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याविरोधात रत्नागिरीत वातावरण पेटत असल्याने मिंधे गटाच्या पायाखालची वाळू सरकली. आज मिंधे गटाचे पदाधिकारी विवा हॉटेल मध्ये घुसले आणि दादागिरी करायला सुरूवात करत सभा उधळवली.

ठार मारलात तरी ठराव मांडणार नाही

शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सामाजिक कार्यकर्ते विजय जैन यांना लक्ष्य केले.पालकमंत्री उदय सामंत यांनी चांगली कामे केली आहेत असा ठराव मांडण्याची जबरदस्ती विजय जैन यांच्यावर केली.यावेळी विजय जैन यांनी ठार मारलात तरी मी असा ठराव मांडणार नाही असे ठणकावून सांगितले.

विजय जैन आणि मिलिंद कीर यांना नोटीस

शिंदे गटांने दादागिरी करत नागरिकांची सभा उधळली याकडे पोलिसांनी दुर्लक्ष करत उलट माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर आणि सामाजिक कार्यकर्ते विजय जैन यांनाच नोटीस बजावली आहे.