शिक्षक भरतीनंतरही रत्नागिरी जिल्ह्यात 1063 शिक्षकांची पदे रिक्त; अनेक शाळांमध्ये एकाच शिक्षकावर पडणार भार

रत्नागिरी जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षक भरती झाली असली तरी अजूनही ही भरती अपुरीच आहे. मे महिन्यामध्ये रत्नागिरी जिल्हा परिषदेने 996 शिक्षकांची भरती केली. ही भरती होऊनही जिल्ह्यात अद्याप 1 हजार 63 शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शून्य शिक्षकी शाळांचा प्रश्न संपला असला तरी एक शिक्षकी शाळांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यात शून्य शिक्षकी शाळा होऊ नये याकरीता रिक्त पदांनुसार शाळांना एक एक शिक्षक देताना शिक्षण विभागाला कसरत करावी लागत आहे.

रत्नागिरी जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक पदे मोठ्या संख्येने रिक्त झाल्यामुळे अनेक शाळा शून्यशिक्षकी शाळा झाल्या होत्या. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरीता 2023-24 या वर्षाकरीता मानधनावर तात्पुरते शिक्षक नेमण्यात आले होते. त्यानंतर जिल्ह्यात शिक्षक भरती झाली.

लोकसभा निवडणूकीच्या आचारसंहितेमुळे ही शिक्षक भरती रखडली होती. मे महिन्यामध्ये अखेर या शिक्षक भरतीला मुहूर्त मिळाला. समुपदेशनाद्वारे रत्नागिरी जिल्ह्यात ९९६ शिक्षकांची पदे भरण्यात आली. त्यामध्ये पहिली ते पाचवीपर्यंत 714 उपशिक्षक भरण्यात आले. सहावी ते आठवीपर्यंत 230 पदवीधर शिक्षक भरण्यात आले आणि उर्दूचे 58 शिक्षक भरण्यात आले. जिल्ह्यात 996 शिक्षकांची भरती होऊनही 1 हजार 63 शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे भरती होऊनही शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न कायम आहे.

996 शिक्षकांच्या भरतीमुळे शून्य शिक्षकी शाळांचा प्रश्न मिटला आहे. नवीन शिक्षक भरतीत शून्य शिक्षकी शाळांना प्राधान्य देण्यात आले होते. भरतीमुळे शून्य शिक्षकी शाळांचा प्रश्न संपला असला तरी एक शिक्षकी शाळांची संख्या वाढली आहे. रिक्त पदांमुळे काही शाळांमध्ये एक-एक शिक्षक नेमताना शिक्षण विभागाला कसरत करावी लागली आहे.