जिल्हा परिषदेच्या चोरवणे (ता. संगमेश्वर) येथील मराठी शाळेतील एक शिक्षक सातत्याने रजेवर जात असून ते शाळेत येत नाही. शिक्षक गैरहजर राहत असल्यामुळे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे आजपासून विद्यार्थ्यांना शाळेत न पाठवून ती बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. सर्व ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले आहे.
शाळेत मुख्याध्यापकासह चार शिक्षक आहेत. त्यातील एक शिक्षक वर्षभर नसल्यासारखेच आहेत. ही बाब संगमेश्वर पंचायत समितीच्या संबंधित गट शिक्षणाधिकारी यांच्या निदर्शनास पालकांनी आणून दिली. मात्र गटशिक्षणाधिकारी शाळेला आम्ही दुसरा शिक्षक देवू असे आश्वासन गेले वर्षभर देत आहेत. अशा प्रकारांमुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.
या शाळेत राजेश यादव यांची शिक्षक म्हणून नियुक्त आहेत. ते वारंवार रजेवर असतात. नेहमी आजारी असल्याचे कारण देतात. याबाबत ग्रामस्थांनी निवेदने देऊन सुद्धा संबंधित शिक्षकाला हजर करून घेण्याचे आदेश प्रशासन देत आहे. राजेश यादव या शिक्षकांची प्रशासनाकडून चौकशी देखील केली गेली आहे. याप्रश्नी गट शिक्षणअधिकारी हे पालक सभेस उपस्थित देखील राहत नाहीत. विद्यार्थ्यांची व पालकांची व्यथा जाणूनदेखील घेत नाहीत. त्यामुळे आज 20 जानेवारीपासून पालकांनी मुलांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. शाळेला कुलप ठोकले आहे.
या कालावधीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यास संबंधित शिक्षण विभाग जबाबदार असेल असा इशारा देण्यात आला आहे. पालकातही याबाबत कमालीची नाराजी आहे.
याबाबतची माहिती अशी १८ ऑक्टोबर २०२३ रोजी पंचायत समिती देवरुख (संगमेश्वर) चे गटशिक्षणाधिकारी प्रदिप पाटील यांच्याकडे गावातील 60 पालक याबाबत निवेदन देण्यासाठी गेले होते. त्यात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय शिदम, उपाध्यक्ष, दिपराज कांबळे, सरपंच,दिनेश कांबळे, उपसरपंच,अनंत बसवणकर, माजी सरपंच,दीपिका पडीलकर, मुख्य गावकर सखाराम कांबळे आदी सहभागी होते.