चांगले गुण देतो सांगून शिक्षकाने ‘गुण’ उधळले; विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन करणाऱ्या शिक्षकावर गुन्हा

रत्नागिरी शहरातील एका शाळेत दहावीतील विद्यार्थिनीला प्रॅक्टिकल शिकवण्याच्या बहाण्याने चांगले गुण हवे असतील तर मला खूष ठेवावे लागेल असे सांगून ‘गुण’ उधळणाऱ्या शिक्षकाला महिलांनी चोप दिला. त्या शिक्षका विरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रथमेश नवेले असे शिक्षकाचे नाव आहे. संबधित शिक्षणसंस्थेने त्या शिक्षकाचे निलंबन केले आहे.

पीडित विद्यार्थिनीने पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. 9 जानेवारी रोजी दुपारी शाळेत शेती व पशुपालन या विषयाचे प्रॅक्टिकल सुरू होते. त्यावेळी तीन विद्यार्थिनी बॅचला होत्या. त्यावेळी शिक्षक प्रथमेश नवेले याने गुलाबाच्या फांद्या आणल्या होत्या. त्याचे कलम कसे करायचे हे तो शिकवत होता. त्याने गुलाबांची रोपे पिशवीत लावण्यास सांगितली. त्यावेळी दोन विद्यार्थिनी माती आणण्यासाठी बाहेर गेल्या. त्यावेळी पीडित विद्यार्थिनीच्या जवळ जाऊन शिक्षकाने तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तुला चांगले गुण हवे असतील तर मला खूष ठेवावे लागेल असे त्या शिक्षकाने सांगितले. तेव्हा ती विद्यार्थिनी घाबरून वर्गाबाहेर निघून गेली.

हा सर्व प्रसंग पीडित विद्यार्थिनीने तिच्या मैत्रिणींना सांगितला. त्यानंतर पीडितेच्या मैत्रिणींनी हा प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानंतर पालकांनी शाळेत येऊन शिक्षकाला जाब विचारत चोप दिला. त्या शिक्षकावर पोक्सो अंतर्गत रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.