रत्नागिरी जिह्यात सक्शन पंपाने वाळू काढण्याच्या प्रकाराकडे अधिकाऱयांकडून दुर्लक्ष झालेले आहे. पण अशा बेकायदा पद्धतीने सक्शन पंपाद्वारे वाळू काढणाऱयांवर पुढील आठ दिवसांत कारवाई केली जाईल, असे आश्वासन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज दिले.
शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी रत्नागिरी जिह्यातील वाळू चोरीकडे सभागृहाकडे लक्ष वेधले. वाळू व्यवसाय करणारे अधिकाऱयांवर कशा गाडय़ा घालतात, कसे ट्रक्टर घालतात हे सर्व रंगवून सांगतात. वाळू व्यवसाय करणाऱयांना आपण तस्कर म्हणतो, पण सरकारी यंत्रणा जोपर्यंत सहकार्य करीत नाही तोपर्यंत त्यांची हिंमत वाढत नाही. वाळू व्यवसायात प्रचंड प्रमाणात हप्ते आहेत की त्याला सीमा नाही. आपण परवानग्या देतो. वाळूच्या माध्यमातून सरकारला दरवर्षाला सुमारे 232 ते 238 कोटी रुपयांचा महसूल मिळतो. पण सरकारला अधिकृतपणे मिळणाऱया महसुलापेक्षा जास्त पटीने अधिकाऱयांकडे हप्ता जातो.
रत्नागिरी जिह्यात हातपाटीने वाळू चोरून काढायचे, पण आम्ही दुर्लक्ष करीत होतो, पण आमच्या जिह्यात आम्ही कधी सक्शन पंपांना परवानगी दिली नाही. गेली तीन-चार वर्षांपासून आमच्या रत्नागिरी जिह्यात हैदोस घातला आहे. कोणी सक्शन पंप लावायचा व त्याची वाळू कशी पास करून द्यायची याचे काम पोलीस घ्यायला लागले आहेत. रत्नागिरी जिह्यात कायदा कधी मोडला जात नव्हता. या ठिकाणचे सक्शन पंप बंद करणार का, असा सवाल भास्कर जाधव यांनी केला.