शेअर मार्केटमध्ये चांगला परतावा देण्याच्या नावाखाली प्रौढाची साडेपाच लाखांची फसवणूक

शेअर मार्केटमध्ये चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत महिलेने प्रौढाची तब्बल 5 लाख 75 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. ही घटना 29 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 ते 13 मे 2024 रोजीच्या कालावधीत घडली आहे.

याप्रकरणी अपोलो ग्लोबल मॅनेजमेंट कंपनीची अ‍ॅडव्हायझर सांची अरोरा विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिच्या विरोधात अभय कुष्णनाथ पंडीत (52,रा.मारुती मंदिर,रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, त्यांनी फेसबुक अ‍ॅपवर अपोलो स्पॉनसर जॉईन अवर फ्री व्हॉटसअ‍ॅप स्टडी ग्रुप ऑफ शेअर मार्केटिंग अशी जाहिरात पाहिली.

या प्रसिध्द कंपनीच्या नावाने गुंतवणूकीचे व त्यावर चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत अ‍ॅडव्हायझर सांची अरोरा हिने तयार केलेल्या व्हॉटअ‍ॅप ग्रुपवर फिर्यादी पंडित यांना जॉईन करुन घेतले. त्यानंतर प्रोफेसर जॉनहॅसमॅन यांच्या आवाजातील ऑडिओव्दारे विश्लेषण करुन अपोलो मोरसेल्लो या अ‍ॅपचा वापर करुन चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. या आमिषाला बळी पडून फिर्यादीने त्यात 8 लाख रुपये गुंतवले. त्यापैकी 2 लाख 25 हजार रुपये परत मिळाले परंतू उर्वरित 5 लाख 75 हजार रुपये परत न देता त्यांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी संशयित महिलेविरोधात भादंवि कायदा कलम 420 माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 (क) (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.