गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या…गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला अशा जयघोषात आज गौरी गणपतींना निरोप देण्यात आला.रत्नागिरी जिल्ह्यात आज 1 लाख 15 हजार 234 घरगुती गणपतीचे आणि 17 सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.ढोलताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतषबाजीत आज विसर्जन सोहळा रंगला.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 1 लाख 66 हजार 986 घरगुती आणि 116 सार्वजनिक गणेशोत्सवाच्या गणेशमुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.कोकणतील घराघरात मंगलमय वातावरणात गणेशोत्सव सुरू आहे.घरच्या गणपतीसाठी चाकरमानी मोठ्या संख्येने गावी आले आहेत.गणपतीबाप्पासाठी आकर्षक सजावट करण्यात आली आहे.विविध देखावे उभारण्यात आले होते.
शनिवारी वाजत-गाजत गणपती बाप्पाचे आगमन झाले.मंगळवारी गौराईचं आगमन झाले.बुधवारी गौरीपूजन करण्यात आले.आज वाजत-गाजत गौरी गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला.
रत्नागिरी शहरातील मांडवी समुद्र किनारी गणपती बाप्पांचा विसर्जन सोहळा रंगला.सायंकाळी चार वाजल्यानंतर विसर्जन सोहळ्याला प्रारंभ झाला.गणपती बाप्पाचे वाजत-गाजत समुद्रकिनारी आगमन झाले.त्यानंतर पुजाअर्चा आणि आरती करण्यात आली.आरतीनंतर गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला.