
उद्योगपती रतन टाटा यांचे गेल्या वर्षी निधन झाले. आता त्यांच्या मृत्यूपत्रातून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. त्यांची संपत्ती साधारण 3 हजार 900 कोटी रुपये आहेत. यात टाटा सन्सचे शेअर्स आणि इतर मालमत्ता यांचा समावेश आहे. मृत्युपत्रात त्यांच्या संपत्तीचा मोठा हिस्सा समाजसेवेसाठी दान करण्यात आला आहे. तसेच रतन टाटा एन्डॉवमेंट आणि रतन टाटा एन्डॉमेंट ट्रस्ट यांना देणगी देण्यात आली आहे.
मालमत्तेपैकी एक तृतीयांश संपत्ती सावत्र बहिणी शिरीन जेजीभॉय आणि दिना जेजीभॉय यांच्या नावे करण्यात आली आहे. 800 ते 850 कोटींची ही संपत्ती असून यात बँक एफडी, आर्थिक साधने, घडय़ाळ आणि पेंटिंग यांचा समावेश आहे. टाटांची 65 मौल्यवान घडय़ाळेही आहेत. सेशेल्समधील जमीन आरएनटी असोसिएट्स सिंगापूरकडे जाईल. याशिवाय एक तृतीयांश हिस्सा मोहिनी एम दत्ता या टाटा समूहाच्या माजी कर्मचारी महिलेला दिला जाणार आहे.
भावाला जुहूतील बंगला तर मित्राला अलिबागची मालमत्ता
रतन टाटांचे भाऊ जिमी नवल टाटा यांना जुहू येथील बंगल्याचा वाटा तर रतन टाटांचा जवळचा मित्र मेहली मिस्त्राr यांना अलिबागची मालमत्ता देण्यात येणार आहे. तसेच तीन बंदुकाही देण्यात येतील. ज्यात 25 बोअरच्या पिस्तुलाचा समावेश आहे.
प्राण्यांसाठी 12 लाख
रतन टाटा यांनी त्यांच्या पाळीव प्राण्यांसाठी 12 लाख रुपयांचा निधी ठेवला असून त्यातून प्रत्येक प्राण्याला दर तीन महिन्यांनी 30 हजार रुपये खर्च दिला जाईल. टाटांचे सहाय्यक शंतनू नायडू यांचे विद्यार्थी कर्ज आणि शेजारी जेक मलाईते यांचे व्याजमुक्त शैक्षणिक कर्ज माफ करण्यात आले आहे.
– रतन टाटा यांची परदेशात सुमारे 40 कोटी रुपयांची संपत्ती आहे. सेशेल्समधील जमीन, वेल्स फार्गो आणि मॉर्गन स्टेंनली येथील बँक खाती तसेच कंपन्यांमधील शेअर्स यांचा या संपत्तीत समावेश आहे.