रस्ता नूतनीकरणासाठी रास्ता रोको, भंडारा-बालाघाट मार्गावर तीन तास वाहतूक ठप्प

रेतीच्या जड वाहतुकीने महालगाव ते नाकाडोंगरी राज्यमार्ग खचला आहे. या मार्गावरून डांबर आता दिसेनासा झाला असून, रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे या रस्त्यावरुन चालणेही कठीण झाले आहे. मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहेत. यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी भंडारा-बालाघाट राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. नाकाडोंगरी, महालगाव येथील गावकरी आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले आहेत.

नाकाडोंगरी, महालगाव मार्गावरून बेधडकपणे ओव्हरलोड रेतीचे ट्रक भरधाव वेगाने धावत आहेत. अनधिकृत रेतीच्या चोरट्या वाहतुकीने नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत. रस्त्याने चालायचे की मरायचे असा एकच सवाल उपस्थित होत आहे.

आंदोलनामुळे भंडारा-बालाघाट मार्ग तब्बल तीन तास ठप्प होता. महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनाच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. या मार्गावर अवैध रेती चोरी बंद व्हावी, महालगाव- नाकाडोंगरी मार्गाची त्वरित दुरूस्त करण्यात यावी, ब्राम्हणटोला-बिनाखी रोडवर अवजड वाहनांना वाहतूक करण्यास बंदी यावी अशा मागण्यांसाठी महालगाव फाटा रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.