
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रथम प्र-पुलगुरू तथा धरमपेठ कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. योगानंद काळे यांचे नुकतेच निधन झाले. डॉ. काळे यांच्या निधनाने विदर्भातील शैक्षणिक, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.
डॉ. योगानंद काळे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रथम प्र-पुलगुरू म्हणून 22 ऑगस्ट 1995 पासून 24 एप्रिल 1997 पर्यंत आणि तद्नंतर 7 जुलै 1997 ते 19 जुलै 1999 पर्यंत कार्य केले होते. तसेच एम.पी. देव स्मृती धरमपेठ महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून त्यांनी 1990 ते 1995 काम केले. भारतीय अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक तसेच सुप्रसिद्ध अर्थतज्ञ होते. हिंदुस्थानच्या अर्थशास्त्राची जगभरात प्रवास करून मांडणी केली. ‘आर्थिकदृष्टय़ा विदर्भ राज्याची सक्षमता’ या विषयावर त्यांचे विशेष प्रभुत्व होते.
वऱहाडातील बुलढाणा जिह्यातील साखरखेर्डा येथे त्यांचा जन्म 1940 मध्ये झाला होता. एक लहानसे, मात्र ब्रह्मीभूत पै. प्रल्हाद महाराज (काळे) यांच्या पवित्र वास्तव्याने पुनीत झालेले नामवंत साखरखेर्डा गाव हे डॉ. योगानंद काळे यांचे जन्मगाव व महाराजांचे घराणे हे त्यांचे जन्मघराणे. सहा भाऊ, दोन बहिणी आणि आई-वडील असा परिवार, अशा पार्श्वभूमीवर डॉ. योगानंद काळे यांचा खेडय़ातील प्राथमिक शिक्षणापासून तर थेट राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्र-पुलगुरूसारख्या सन्माननीय उच्च पदापर्यंतचा प्रवास जसा कष्ट आणि संघर्ष यांनी भरलेला आहे तसाच तो कर्तृत्ववान आहे. एमका@म, एमफील, डीबीएम या विद्यापीठीय पदव्या त्यांनी प्राप्त केल्या व नागपूर येथील पूर्वीच्या धरमपेठ म. पा. देव विज्ञान आणि धरमपेठ आर्टस् आणि का@मर्स महाविद्यालयात सुरुवातीला सुमारे 11 वर्षे प्राध्यापक म्हणून, नंतर त्याच महाविद्यालयात सुमारे 14 वर्षे उपप्राचार्य म्हणून आणि अखेरीस त्याच महाविद्यालयात प्राचार्य या नात्याने जबाबदारी सांभाळली. याच काळात ऑगस्ट 1995 मध्ये त्यांची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात प्र-पुलगुरू म्हणून नियुक्ती झाली होती.
एक प्रभावी वत्ते, समर्पित शिक्षक, पुशल व मनमिळाऊ प्रशासक आणि विद्यार्थीप्रिय प्राध्यापक या नात्याने त्यांचा लौकिक सर्वदूर पसरला. ‘विदर्भाचा आर्थिक अनुशेष’ या विषयावरील त्यांचा संशोधनपर प्रबंध खूपच गाजला व आज त्याला एक संदर्भ मूल्य प्राप्त झाले आहे. ‘तरुण भारत’, ‘हितवाद’, ‘लोकमत’ यांसारख्या स्थानिक नियतकालिकांतून समकालीन आर्थिक प्रश्नांविषयी त्यांनी भरपूर लेखन केले, तसेच विद्यार्थ्यांच्या उपयोगी अशा क्रमिक पुस्तकांचे लेखनही केले. आणि वाणिज्य शाखेतील Ph.D.साठी मान्यताप्राप्त मार्गदर्शक म्हणूनही त्यांनी काम केले. इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ अॅडव्हान्स स्टडीज, शिमला या प्रतिष्ठत शासकीय संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्यत्वही त्यांना प्राप्त झाले होते.
डॉ. भालचंद्र चोपणे पुलगुरू असताना डॉ. काळे दुसऱयांदा नागपूर विद्यापीठाचे प्र-पुलगुरू झाले. यादरम्यान नागपूर विद्यापीठात बोगस गुणपत्रिका प्रकरणामुळे विद्यापीठाची प्रतिमा देशात मलिन झाली. त्यामुळे दोघांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. काळे यांची दुसरी इनिंग अर्धवट राहिली. विद्यापीठात ते सर्वांना घेऊन काम करीत होते, विद्यार्थ्याच्या समस्या सोडविण्यात त्यांची हातोटी होती. त्यांनी आपल्या उर्वरित आयुष्यातही स्वतःला सामाजिक क्षेत्रात झोपून दिले होते. स्वदेशी जागरण मंचाचे काम ते शेवटपर्यंत करीत होते. डॉ. काळे यांच्या जाण्याने विदर्भाची हानी झाली आहे.
> महेश उपदेव