कथा एका चवीची – खाजा उत्तर प्रदेश, ओडिशा व्हाया मालवण

>> रश्मी वारंग

मालवणी खाजे हा कोकणात सर्रास आढळणारा पदार्थ. विशेषत कोकणात जत्रांमध्ये हा पदार्थ आढळतोच. अशा या खाजाची ही गोड गोष्ट.

तुळशीचं लग्न झालं की, कोकणातल्या गावागावांमध्ये जत्रांचे पेव फुटते. जत्रा म्हणजे गावातल्या देवी-देवतांचा महाउत्सव. या उत्सवासोबतच आबालवृद्धांना प्रतीक्षा असते जत्रेतल्या खास खवय्येगिरीची. कोकणात जत्रांमध्ये विशेष करून आढळणारा पदार्थ म्हणजे खाजा. या खाजाची ही गोड गोष्ट.

मालवणी खाजे हा कोकणात सर्रास आढळणारा पदार्थ. कोकणाबाहेर याला शेंगोळ्या असेही म्हटले जाते. बेसन, गुळासह काही मोजक्या पदार्थांपासून तयार होणाऱ्या मालवणी खाजाचे अनेक प्रकार कोकणात तयार होतात. शिवाय मुंबईत ठिकठिकाणी भरणाऱया ‘मालवणी जत्रे’तही स्पेशल ‘मालवणी खाजा’चे स्टॉल पाहायला मिळतात. मिट्ट गोड खाजामध्ये आल्याचा थोडासा स्पर्श देऊन तिखट-गोड असा संगम साधता येतो. एकेकाळी कोकणातून येताना जे खास पदार्थ मुंबईकर घेऊन येत त्याच्यात मालवणी खाजा लोकप्रिय होते.

अलीकडच्या काळात या मालवणी खाजाइतकीच बंगाली खाजाची चलती कोकणात दिसते. कोकण रेल्वेच्या माध्यमातून वेगवेगळ्या भागांतली संस्कृतीचं आदान-प्रदान होत असताना मूळचा उत्तर प्रदेश, ओडिशातला हा खाजा बंगाली मिठाई म्हणून कोकणात सर्रास विक्रीसाठी ठेवला जातो. मालवणी खाजाचा आणि या बंगाली खाजाचा सुतराम संबंध नाही. दोघांच्या चवीत विलक्षण फरक आहे.

हा खाजा किंवा बंगाली खाजा जुन्या मगध राज्यामध्ये उदयाला आला. तरीही कर्नाटक, आंध्र प्रदेशपासून उत्तर प्रदेशापर्यंत सर्व प्रांतांमध्ये तो आढळतो. गव्हाचे पीठ, मावा आणि तेल इतक्या माफक सामग्रीवर हा खाजा तयार होतो. साखरेच्या पाकात त्याला घोळवले जाते. बिहारमध्ये छटपूजा ते मुलीच्या लग्नापर्यंत सर्व ठिकाणी हा खाजा आवडीने खाल्ला जातो. नालंदा विद्यापीठाजवळच्या सिलाव नावाच्या गावातील खाजा हा विशेष लोकप्रिय आहे. त्याला भौगोलिक मानचिन्ह प्राप्त झाले आहे. अगदी ऋग्वेदापासून ते आर्य चाणक्याच्या अर्थशास्त्रापर्यंत या खाजाचे संदर्भ विपुल प्रमाणात पसरलेले दिसतात.

अगदी गौतम बुद्धांनादेखील हा खाजा प्रिय असलेला दिसून येतो. असे म्हणतात की, गौतम बुद्ध दुधामध्ये खाजा मिसळून आपल्या शिष्यांना देत असत. तेराव्या शतकातील ‘मानसोल्हास’ या राजा सोमेश्वराच्या ग्रंथामध्ये ‘खाज्जक’चा उल्लेख होतो. राजाला द्यायच्या भेटवस्तूमध्ये खाजाचा समावेश झालेला दिसतो. सुप्रसिद्ध चिनी प्रवासी ह्युआन त्सांग या खाजाची तुलना मध्यपूर्व देशातल्या ‘बकलावा’ नामक पदार्थाशी करतो. उत्तर प्रदेश, बिहारमधून ओडिशात गेले तर पुरीच्या जगन्नाथ मंदिरात महाप्रसाद वा छप्पन भोगमध्ये हा खाजा महत्त्वाचा ठरतो.

मालवणी खाजे ते हे बंगाली खाजा बनवण्याच्या पद्धती, वापरले जाणारे घटक पदार्थ सगळ्यात फरक असूनही एका बाबतीत मात्र समान ठरतात, लोकप्रियता. खज्जक ते खाजा हा प्रवास म्हणूनच रोचक ठरतो.