पहिल्या डावातील आघाडीनंतरही झिम्बाब्वेवर पराभवाचे सावट

पहिल्या डावात 86 धावांची दमदार आघाडी घेतल्यानंतरही झिम्बाब्वेवर अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱया कसोटी सामन्यात पराभवाचे संकट ओढावले आहे. पहिल्या डावात पिछाडीवर असलेल्या अफगाणिस्तानने दुसऱया डावात रहमत शाह (139) आणि इसमत आलम (101) यांच्या शतकी खेळींच्या जोरावर 363 अशी दमदार मजल मारत झिम्बाब्वेसमोर 278 धावांचा जबर आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना राशीद खानच्या भन्नाट फिरकाने झिम्बाब्वेची चौथ्या दिवसअखेर 8 बाद 205 अशी अवस्था केली आहे. उद्या कसोटीचा शेवटचा दिवस असून झिम्बाब्वेला विजयासाठी अद्याप 73 धावांची गरज आहे. राशीदने जादुई फिरकी मारा करताना 66 धावांत 6 विकेट घेत झिम्बाब्वेला पराभवाच्या दरीत ढकलले आहे. दोन्ही संघातील पहिला कसोटी सामना अनिर्णितावस्थेत सुटला होता.