जगभरातून बातम्यांचा थोडक्यात आढावा

अपघातानंतर रॅपिडो ड्रायव्हर पळाला; तरुणी गंभीर जखमी
सध्या दुचाकी आणि चारचाकी गाडी बुक करणे सर्रास झाले आहे. परंतु रॅपिडो बाईक बुक करणे एका तरुणीला चांगलेच महागात पडले. रॅपिडो बाईकचा अपघात झाल्यानंतर ड्रायव्हर पळून गेला, मी जखमी झाले. माझ्या पायाला दुखापत झाली, असा अनुभव एका तरुणीने सोशल मीडियावरून शेअर केला.

रॅपिडो चालक निष्काळजीपणाने गाडी चालवत होता, असेही तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. पायाला दुखापत झाली असून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत, असे सांगत तिने दुखापत झालेल्या पायाचा फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे.

आलिशान ‘वंदे भारत’ ट्रेनमध्ये टिपटिप बरसा पानी…
दिल्लीहून वाराणसीला जात असलेल्या धावत्या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये छतावरून पाणी डब्यात गळत असल्याने प्रवासी हैराण झाले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हजारो रुपये मोजून वंदे भारतने प्रवास करणाऱया प्रवाशांनी याबद्दल तक्रारी नोंदवल्या आहेत. अनेक प्रवासी उत्तर रेल्वेला टॅग करून आपला संताप व्यक्त करत आहेत. छतावरून पाणी गळत असून ते थेट सीटवर पडत आहे, असेही प्रवाशांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. आपल्या वंदे भारत रेल्वेचे हाल पाहा. जास्त पैसे मोजून का म्हणून प्रवास करायचा, असा संतप्त सवालही प्रवाशांनी विचारला.

एडुटेक स्टार्टअप; 250 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले
अनऍकॅडमीने कंपनीत पुन्हा एकदा कर्मचारी कपात केली. या वेळी कंपनीने 250 कर्मचाऱयांना कामावरून काढून टाकले आहे. सॉफ्टबँकेच्या सपोर्टची एडुटेक स्टार्टअप अनऍकॅडमीने डिस्ट्रीब्यूशनसह अन्य विभागांतील जवळपास 100 कर्मचाऱयांना नारळ दिला, तर अन्य कर्मचारी कपात ही सेल्स डिपार्टमेंटमधील आहे. याआधीही कंपनीने दोन वेळा कर्मचारी कपात केली. मार्च 2023 मध्ये आणि एप्रिल 2022 मध्ये कंपनीने कर्मचारी कपात केली होती.

ब्रिटिश नर्सने केली अर्भकाची हत्या
ब्रिटिश नर्स लुसी लेटबी हिला दोन तास आधी जन्मलेल्या बाळाच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. तिला 5 जुलै रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. सात नवजात बालकांच्या हत्येप्रकरणी ल्युसीला यापूर्वीच जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. लुसीने बाळाच्या श्वासोच्छ्वासासाठी लावलेल्या नळीशी छेडछाड केली आणि बाळाचा मॉनिटरही बंद केला, असा तिच्यावर आरोप आहे. दरम्यान, 2018 मध्ये ल्युसी लेटबीला पहिल्यांदा अटक करण्यात आली होती. जून 2015 ते जून 2016 या कालावधीत वायव्य इंग्लंडमधील कऊंटेस ऑफ चेस्टर हॉस्पिटलमध्ये तिने हे खून केले.

50 रुपयांसाठी तलाठी निलंबित
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी उत्पन्नाचा दाखला देण्यासाठी एका तलाठय़ाने 50 रुपयांची मागणी केली. 50 रुपयांची मागणी करणाऱया तलाठय़ाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर अमरावती जिल्हाधिकाऱयांनी तलाठय़ावर निलंबनाची कारवाई केली. तुळशीराम महादेव कंठाळे (वय 55) असे निलंबित करण्यात आलेल्या तलाठय़ाचे नाव आहे. तुळशीराम कंठाळे हा तलाठी गरजू महिलांकडून उत्पन्नाच्या दाखल्यासाठी 50 रुपये घेत होता. हा व्हिडीओ एका जागरूक तरुणाने सोशल मीडियावर व्हायरल केला.

दिल्लीत हीट स्ट्रोकने 28 मोरांचा मृत्यू
दिल्लीच्या पालम एअर बेसमधील 28 मोरांचा मृत्यू हा हीट स्ट्रोकमुळे झाल्याने खळबळ उडाली आहे. दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उष्माघात वाढला आहे. मोराच्या मृत्यूनंतर वन विभागाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. 28 जूनला पाऊस बरसल्यानंतर तापमानात घसरण झाली. यानंतर कोणत्याही मोराचा मृत्यू झाला नसल्याची माहिती समोर आली आहे. मोराच्या मृत्यूला हीट स्ट्रोक हे एकमेव कारण नसून शवविच्छेदनात निमोनिया आणि हेपेटोसिस हेही कारण असल्याचे समोर आले आहे.