Dharashiv News – 81 वाघ पकडणारी ताडोबा येथील रॅपिड रिस्पॉन्स टीम जिल्ह्यात दाखल

यवतमाळ येथील टिपेश्वर अभयारण्यातून रामलिंग अभयारण्यात आलेल्या वाघाला अखेर जेरबंद करण्याचे आदेश राज्य सरकारने वन विभागाला दिले आहेत. त्यानुसार चंद्रपूर जिह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील 10 जणांची रॅपिड रिस्पॉन्स  टिम मंगळवारी (14 जानेवारी) येडशी परिसरातील रामलिंग अभयारण्यात दाखल झाली आहे. या टिमने आतापर्यंत 81 वघा पकडले आहेत.

मागील तीन आठवड्यांपासून धाराशिव आणि बार्शी तालुक्यातील काही भागात वाघ दिसून आला आहे. या वाघाने आत्तापर्यंत या भागात सुमारे 40 हून अधिक जनावरांवर हल्ला केला आहे. त्यानंतर सदरील वाघाला पकडण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती मागील आठवड्यात वन विभागाने राज्य सरकारकडे केली होती. यावर शनिवारी राज्य सरकारने वाघाला पकडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ताडोबा येथील दहा जणांची रॅपिड रिस्पॉन्स टीम डॉ. रविकांत खोब्रागडे यांच्या नेतृत्वात धाराशिव येथील रामलिंग अभयारण्यात दाखल झाली आहे. डॉ. रविकांत खोब्रागडे हे या रॅपिड रिस्पॉन्स टीमचे प्रमुख आहेत.

ट्रॅप कॅमेरे लावले, फुट प्रिंटचा शोध सुरू

वाघाला पकडणे हे अवघड काम आहे. हे काम शास्त्रीय पध्दतीने करणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रथम या वाघाचा शोध घेण्यासाठी रामलिंग अभयारण्य परिसरात ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. या ट्रॅप कॅमेऱ्यात जर वाघ दिसून आला, तर या टिमला पुढील कारवाई करणे सोपे होणार आहे. तसेच या टिमने आज वाघाच्या फुटप्रिंटचा शोध घेतला. “आज आम्ही रामलिंग अभयारण्यात ट्रप कॅमेरे लावले असून वाघांच्या ठशाचा शोध घेत आहोत. एकदा वाघ आढळून आल्यावर पुढील कारवाई केली जाईल.” अशी माहिती डॉ. रविकांत खोब्रागडे यांनी दिली.