![Court](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/11/Court-Room-696x447.jpg)
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एका युवकाला दोषी ठरवीत वाई न्यायालयाने तब्बल 20 वर्षे कारावास व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. वाईचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आर. एन. मेहेरे यांनी हा निकाल दिला.
सूरज महादेव चव्हाण (वय 26, रा. शिरवळ, ता. खंडाळा) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. 29 सप्टेंबर 2019 रोजी आरोपी सूरज याने पीडित अल्पवयीन मुलीला भाकरी करून देण्यासाठी घरी बोलावले होते. मुलीच्या आईने परवानगी दिल्यानंतर ती मुलगी सूरजच्या घरात भाकरी करण्यासाठी गेली. मुलगी घरात आली असता, जबरदस्ती करीत सूरजने तिच्यावर अत्याचार केला. यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणाची माहिती मुलीने घरच्यांना दिल्यानंतर शिरवळ पोलीस ठाण्यात पीडितेच्या तक्रारीवरून सूरज चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. वाईचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आर. एन. मेहेरे यांच्या न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली. या खटल्यात सरकारी वकील अॅड. एम. यू. शिंदे यांनी एकूण नऊ साक्षीदार तपासले. तसेच परिस्थितीजन्य पुरावा व साथीदारांच्या साक्षीवरून न्यायाधीश आर. एन. मेहेरे यांनी सूरज चव्हाण याला दोषी ठरवत 20 वर्षांची शिक्षा सुनावली. या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील अॅड. एम. यू. शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, शिरवळचे पोलीस निरीक्षक संदीप जगताप, हवालदार डी. एस. टिळेकर यांनी परिश्रम घेतले. पोलीस अंमलदार काळे, कीर्तिकुमार कदम, घोरपडे, कदम, शिंदे, कुंभार, बांदल यांनी प्रॉसिक्युशन स्क्वॉडला मदत केली.