स्मृतीगंध – मराठवाड्याची सर्वश्रेष्ठ प्रतिभा

>> विश्वास वसेकर

ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे अर्थात रावसाहेब बोराडे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांची ‘पाचोळा’ ही कादंबरी आजही तितकीच लोकप्रिय आहे. मागील आठवड्यातच त्यांना राज्य शासनाचा विंदा करंदीकर पुरस्कार जाहीर करण्यात आला. साहित्यक्षेत्रात आपल्या कामाने अमीट ठसा उमटवणारे रावसाहेब बोराडे यांचे संवेदन शेतीशी एकरूप झालेले होते. अशा शेतकरी मनाच्या लेखकाला, गुरूला त्यांच्या शिष्याने दिलेली ही आदरांजली.

परभणीच्या श्री शिवाजी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला त्याच्या आधीही कितीदा तरी गुरुवर्य रा. रं. बोराडे यांना मी पाहिले, ऐकले होते. बोराडे सर हा मी पाहिलेला पहिला मोठा लेखक. पुढे विद्यापीठातदेखील गुरू भेटले ते सगळे संशोधक आणि समीक्षकच होते. त्यामुळे बोराडे सरांबद्दल असेही मी म्हणू शकतो की, रा. रं. बोराडे हे माझे अती जवळचे ऋणानुबंध असणारे सर्वात मोठे लेखक आणि गुरुवर्य होते.

शिवाजी कॉलेजमधील प्राध्यापकांमध्येसुद्धा आम्ही सुंदर, निर्मळ, निर्मत्सर आणि खेळीमेळीचं वातावरण पाहिले. लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. प्रभाकर मांडे, प्राचार्य रामदास डांगे, नंतर दोनदा कुलगुरू झालेले डॉ. उत्तम भोईटे असे महान शिक्षक आम्हाला घडवीत होते. त्या वेळी विद्यार्थ्यांमध्ये फ. मुं. शिंदे, गणेश घांडगे, सूरमणी दत्ता चौगुले असे बिन्नीचे कलावंत होते.

शेती हा बोराडे सरांच्या संवेदन स्वभावाचा इतका अविभाज्य घटक की, साहित्याच्या संदर्भातही ते जेव्हा विचार आणि लेखन करत, तेव्हाही ते शेतीच्या भाषेत बोलत किंवा लिहीत असत. गंमत म्हणून सरांची स्वतविषयीची ही काही वाक्यं पाहा – ‘शिक्षणामुळे माझ्या मनाची मशागत झाली. शिक्षणामुळे माझ्या मनाला ओल मिळाली. माझ्या मनाची अशी मशागत झाली नसती तर? माझ्या मनाला शिक्षणाची ओल मिळाली नसती, तर माझ्यातल्या लेखकाचं काय झालं असतं? माझ्यातला लेखक अंकुरित झाला असता का? माझ्यातला लेखक असा वाढला असता? माझ्या सर्जनशील मनाच्या शेतात लेखनाची ही पिकं घेताच आली नसती. तर मग एक गंभीर प्रश्न निर्माण होतो. शिक्षणामुळे होणाऱ्या मशागतीअभावी, ओलीअभावी, महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यांतील किती शेतं अशी नापीक झाली असतील?’

बोराडे सरांना वाटायचं की, लेखक जन्माला यावा लागतो हे जितकं खरं, तितकाच लेखक घडविता येतो, लेखक घडवावा लागतो हेदेखील खरं. खाणीतून काढलेल्या हिऱ्याला मोल नसतं, पण त्याला पैलू पाडले की त्याचं मोल वाढतं. नवलेखकांचंही तसंच आहे. या धारणेपोटी बोराडे सरांनी आत्तापर्यंतच्या त्यांच्या साहित्यिक आयुष्यात शेकडो नवलेखकांना आत्मभान देण्याचं, दिशा देण्याचं काम केलं आहे.

1972 चा दुष्काळ हा मराठवाड्याचे जनजीवन सर्वंकषपणाने उद्ध्वस्त करणारा अनुभव होता. बोराडे सरांमधील वत्सल शिक्षक, दक्ष प्राचार्य आणि संवेदनशील लेखक या काळात विलक्षण गतिमान झाला होता. दुष्काळामुळे आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षण सोडून जावे लागू नये म्हणून त्यांनी त्यांना चांगली आर्थिक मदत करत झाडे लावण्याचे काम दिले. 1975 च्या सुमारास माझा मित्र भास्कर चंदनशिव हा बोराडे सरांच्या हाताखाली वैजापूरला रुजू झाला आणि तिथूनच बोराडे सरांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण साहित्याच्या चळवळीने गती घेतली. वैजापूरला याच काळात कथालेखक शिबीर घेण्यात आले. पुढच्या पिढीतले जवळपास सगळे ग्रामीण कथालेखक या शिबिराला उपस्थित होते. 1975 ते 1983 या काळात अशी अनेक शिबिरे बोराडे सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि भास्कर चंदनशिवच्या संयोजनातून वैजापूर आणि मराठवाड्यात घेण्यात आली.

बोराडे सर आणि चंदनशिव यांनी 1983 साली ‘शेतकऱ्यांचा आसूड‘ची जन्मशताब्दी साजरी केली. अशा रीतीने ग्रामीण साहित्याच्या चळवळीचे बीजारोपण आणि वाढ वैजापूर आणि बोराडे, चंदनशिव यांच्यापासून झाली. पुढे श्रेय घ्यायला पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातले लेखक आले व बोराडे सरांनी त्यातून आपले अंग काढून घेतले.

साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आणि शासनाच्या पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष झाल्यानंतर सरांनी आपली पुस्तकं पुरस्कारासाठी पाठवणं बंद केलं. ‘देण्याची क्षमता माणसात निर्माण होते तेव्हा घेण्याची लालसा त्याने सोडावी’ अशी या संदर्भात त्यांची भूमिका. त्याउलट त्यांनी स्वततर्फे आणि ते संस्थापक अध्यक्ष असलेल्या ‘शिवार सांस्कृतिक प्रतिष्ठान’ या संस्थेच्या वतीने ‘शेतकरी साहित्य’ पुरस्कार सुरू केला. सरांच्या वाढदिवशी म्हणजे 25 डिसेंबर रोजी शेतकऱ्यांच्या जगण्याचं वास्तव चित्रण करणाऱ्या एका सर्वोत्कृष्ट साहित्यकृतीला हा पुरस्कार दिला जातो. सरांचे लाडके विद्यार्थी कविवर्य फ. मुं. शिंदे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सासवडला अध्यक्ष झाल्यानंतर अत्यंत निस्संगपणाने त्यांनी अध्यक्षीय निवडणुकीतून स्वतचे नाव कायमचे मागे घेतले. यातली सरांची बाजू जरी समजण्यासारखी असली तरी इतका महान आणि सव्यसाची लेखक वयाच्या ऐंशीव्या वर्षांपर्यंत अध्यक्ष होऊ शकला नाही, हा मराठी वाङ्मय संस्कृतीचा करंटेपणा आहे.

(लेखक ज्येष्ठ साहित्यिक आहेत.)