जनता पक्ष आणि मिंधे सरकारची राजवट गरीब आणि सर्वसामान्यांच्या जिवावर उठली आहे. अकोल्यात एका शेतकरी कुटुंबावर सावकार आणि त्याच्या गावगुंडांनी ट्रक्टर चढवून त्यांना मारहाण केल्याची घटना गेल्या आठवडय़ात घडली होती. तशाच घटनेची पुनरावृत्ती बुधवारी जालनामध्ये झाली. पेंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि त्यांचे आमदारपुत्र संतोष दानवे यांच्या कार्यकर्त्यांनी जवखेडा गावात पुंभार समाजाच्या एका गरीब कुटुंबाची जमीन हडपण्यासाठी त्यांना मारहाण करून त्यांचे घर उद्ध्वस्त केले. या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.
जवखेडा गावात पुंभार समाजाचे हे संत्रे कुटुंब पिढय़ान्पिढय़ा वास्तव्य करते आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753/एम हा जवखेडा गावातून जाणार आहे. त्या महामार्गामध्ये संत्रे कुटुंबाचे घर येत असल्याचे सांगत दानवे यांच्या आदेशावरून त्यांच्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱयांना हाताशी धरून संत्रे यांचे घर पाडून टाकले. दानवेंचे आठ-दहा कार्यकर्ते घरात घुसले आणि त्यांनी कपडे फाडून मारहाण केल्याचा संत्रे कुटुंबीयांचा आरोप आहे. घटनेचा व्हिडीओही त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून न्यायाची मागणी केली आहे. महामार्गासंबंधी असलेल्या नियमांचे उल्लंघन करून आपले घर उद्ध्वस्त केले गेले, असे त्यांचे म्हणणे आहे.
जमीन हडपण्याचे कारस्थान
याप्रकरणी हसनाबाद पोलीस ठाण्यात संत्रे कुटुंबीयांनी लेखी तक्रार दाखल केली आहे. त्या तक्रारीवरून पोलिसांनी आठ ते दहा जणांविरुद्ध बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला, मात्र दानवे यांच्या दबावामुळे पोलिसांकडून तपासकामी हयगय केली जात असल्याचाही आरोप होत आहे. संत्रे कुटुंबीयांची जमीन हडपण्यासाठी दानवेंनी हे कृत्य केले असून जालनातील अशा अनेक जमिनी हडपूनच दानवे 42 कोटींचे धनी झाल्याचीही चर्चा आहे.
हा सत्तेचा माज आहे… तो उतरवणारच! विजय वडेट्टीवार यांचा इशारा
विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज जवखेडा येथे जाऊन अन्यायग्रस्त संत्रे कुटुंबाची भेट घेतली आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. स्वतःच्या जमिनी आणि घरे हायवेला जात असतील तर ती वाचवायची आणि दुसऱयांची जमीन हडप करायची, त्यांची घरे उद्ध्वस्त करायची ही सत्तेची मस्ती आहे. आम्ही ती मस्ती उतरवणारच, असा इशारा यावेळी वडेट्टीवार यांनी दिला. संत्रे कुटुंबाच्या संरक्षणाची जबाबदारी पोलिसांची आहे आणि या कुटुंबाला काही झाले तर त्याला दानवे कुटुंब जबाबदार असेल, असेही वडेट्टीवार म्हणाले. संत्रे कुटुंबीयांनी दानवेंचे नाव घेऊन आरोप केल्याने दानवेंविरुद्ध गुन्हा दाखल करून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी करतानाच या घटनेसंदर्भात येत्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेत आवाज उठवू, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.