
छोट्या पडद्यावरील इंडिया गॉट लेटेंट कार्यक्रमादरम्यान वादग्रस्त आणि अश्लील टिपणी केल्यामुळे यूट्यूबर रणवीर अलाहाबादीया अडचणीत आला आहे. यामुळे यूट्यूबर विरोधात मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, या एफआयआरवरून रणवीर अलाहाबादियाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे आणि आणि अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे.
अलाहाबादिया याच्या वतीने वकील अभिनव चंद्रचूड यांनी अर्ज दाखल करत सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्याकडे लवकरात लवकर या प्रकरणाच्या सुनावणीची मागणी केली. मात्र, सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी सध्या तारीख देण्यास नकार दिला आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी अलाहाबादिया याच्या वकिलाला प्रथम रजिस्ट्रीशी संपर्क साधण्यास सांगितले आहे.
इलाहाबादियाला सलग दुसऱ्यांदा समन्स
दरम्यान, रणवीर अलाहाबादियाला पोलिसांनी दुसऱ्यांदा समन्स बजावले आहे. रणवीर अलाहाबादिया याला गुरुवारी त्याचा जबाब नोंदवण्यासाठी बोलावले होते. मात्र, तो पोलिस स्टेशनला पोहोचला नाही. त्यामुळे त्याला आज पुन्हा समन्स पाठवण्यात आले आहे. खार पोलिस स्टेशनमध्ये हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्र सायबर सेल आणि मुंबई पोलिसांनी कॉमेडियन समय रैनालाही पुढील पाच दिवसांत हजर राहण्यास सांगितले आहे.
आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी यूटय़ूबर अलाहाबादीयाविरोधात पोलिसात तक्रार