Rantagiri News : बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार, कॉजवेवर खड्डे पडून लोखंडी शिगा बाहेर

कोकणामध्ये इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पावसाचा जोर हा जास्त असतो. मुसळधार पावासमुळे नद्या सुद्धा दुथडी भरून वाहतात, तर कधीकधी जनजीवन विस्कळीत होण्याच्या घटना सुद्धा घडतात. तसेच बऱ्याच वेळा गावांचा संपर्क सुद्धा तुटतो. दरवर्षी अशी परिस्थिती कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये निर्माण होते. मात्र रत्नागिरी जिल्हा परिषदेला यामध्ये आघाडीवर येण्याची घाई असल्याचे चित्र आहे. कारण बांधाकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे माटवन येथील एका कॉजवेरील स्लॅब उखडून गेल्याने कॉजवेवर मोठमोठे खड्डे पडून त्यातील लोखंडी शिगा बाहेर आल्या आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक जीवघेणी झाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालूक्यातील माटवण आणि टांगर या दोन गावांना जोडणारा माटवण टांगर ग्रामीण मार्ग क्रमांक 253 या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. याच मार्गावर माटवण जवळील एका कॉजवेवर दोन वर्षांपासून खड्डे पडले आहेत. तसेच या कॉजवेवर पडलेल्या खड्ड्यांमधील स्लॅबमधून लोखंडी शिगा बाहरे आल्या आहेत. रस्त्याची इतकी भयानक दुरावस्था झाली असताना देखील जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून मागील दोन वर्षांत काहीच हालचाल करण्यात आलेली नाही. गंभीर बाब म्हणजे सध्या दापोलीमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे या कॉजवेची अवस्था पहिल्यापेक्षा अधिक गंभीर झाली आहे. ग्रामस्थांनी यासंदर्भात वेळोवेळी आवाज उठवून बांधकाम विभागाच्या दोपाली येथील कार्यलयात पत्रव्यवहार केला. तसेच प्रत्यक्ष भेटून सदर प्रकाराची माहिती दिली. मात्र ढीम्म प्रशासनाने रस्त्याची सुधारणा सोडा, साधे खड्डे बुजवण्याचे काम सुद्धा केले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये सध्या संतापाचे वातावरण आहे. हेच का गतिमान शासनाचे गतिमान प्रशासन? असा संतप्त सवाल नागरिकांनी प्रशासनाला विचारला आहे.