डेटा चोरी करून मागितली खंडणी 

खासगी विमा कंपनीचा डेटा चोरी करून खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दक्षिण सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

तक्रारदार हे एका खासगी विमा कंपनीत वरिष्ठ पदावर काम करतात. गेल्या आठवडय़ात त्यांच्या कंपनीच्या ई-मेलवर एक मेल आला. तुमच्या कंपनीचा मोठय़ा प्रमाणात डेटा लीक झाला आहे, मी तुम्हाला दोन दिवस देत आहे, जर तुम्ही उद्यापर्यंत वाटाघाटीवर काही चर्चा नाही केल्यास तो डेटा आपण विक्री करू अशी त्याने धमकी दिली. त्यात ई-मेलमध्ये एक ऍटॅचमेंट फाईल होती. त्यात कंपनीच्या 99 पॉलिसीचा डेटा होता. त्या डेटाबाबत कंपनीची रिस्क टीम तपास करत आहे.

याचदरम्यान कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱयांनादेखील ई-मेल आला. तुम्हाला वॉर्निंग देत आहे, तुम्ही जर वाटाघाटीचा पर्याय निवडला नाही तर डेटा लीक होईल, जर डेटा लीक झाल्यास कंपनीचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान होईल. या घटनेनंतर कंपनीच्या एका प्रतिनिधीने संपर्क केला. तेव्हा तिलादेखील त्याने डेटा लीक किती गंभीर प्रकार असल्याचे सांगितले. डेटा चोरून खंडणी मागितल्याचे उघड झाल्यावर त्याने दक्षिण सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.