बीड पोलीस दलातील निलंबित अधिकारी रणजित कासले सरेंडर होणार

मी वीस वर्षे सायबर पोलीस दलात काम केले आहे. पोलिसांनी कितीही प्रयत्न केले तरी मी त्यांच्या हाती लागणार नाही. मी दररोज दोन गाड्या वापरून लोकेशन बदलत आहे. पोलिसांनी कितीही प्रयत्न केले तरी मी त्यांच्या हाती लागणार नाही, असा दावा करणारा बीड पोलीस दलातील निलंबित अधिकारी रणजित कासले याने पोलिसांसमोर शरणागती पत्कारणार असल्याचे जाहीर केले आहे.

रणजित कासले याने धनंजय मुंडे आणि बीड पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्यामुळे बीड पोलीस रणजित कासले याला शोधत होते. मात्र, रणजित कासले हा गायब झाला होता. त्याने मध्यंतरी एक व्हिडिओ शेअर करून आपल्याला वाल्मीक कराड याच्या एन्काऊंटरची ऑफर मिळाल्याचा दावा केला होता. त्यामुळे रणजित कासले हा नेमका कुठे आहे, याचा शोध बीड पोलिसांनी सुरू केला होता.

या पार्श्वभूमीवर रणजित कासले याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्याने म्हटले आहे की, मी कालपासून काही लोकांच्या कमेंट वाचल्या, काही लोकांशी बोललो. वकील आणि पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधला. तेव्हा मला असं जाणवलं की, आता पळून उपयोग नाही.

मी आजपर्यंत प्रत्येक संकटाचा सामना केला आहे. मी बीड पोलिसांना शरण जाणार आहे. सिस्टीमच्या विरोधात जास्त दिवस लढता येत नाही. या सगळ्यात माझा बळी जाणार, हे मला माहिती झाले आहे. मी पोलीस डिपार्टमेंटचं मीठ खाल्लं आहे, मी जे जे आरोप केले ते मी सिद्ध करून दाखवेन, असे रणजित कासले याने व्हिडिओत म्हटले आहे. त्यामुळे आता रणजित कासले पोलिसांच्या ताब्यात आल्यावर त्याच्या चौकशीतून आणखी काही नव्या गोष्टी समोर येणार का, हे बघावे लागेल. मी लवकरच माझे दोन्ही मोबाईल चालू करणार आहे. मला कॉल करू नका, मला त्रास होतो. मला मेसेज करा, मी मेसेज वाचतो आणि रिप्लाय देतो. मी ज्यांच्यावर आरोप केले, तेच आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. बीड पोलिसांनी मला पकडलं तरी हरकत नाही. मी पोलिसांसमोर हजर होऊन माझी लढाई लढेन, असे कासले याने आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.