ठाकूरचे शोले, मुंबईने जम्मू-कश्मीरला विजयापासून दूर ढकलले

‘ये विकेट हमको दे दे ठाकूर…’ असा जम्मू आणि कश्मीरच्या गोलंदाजांचा आवाज तब्बल तीन तास शरद पवार क्रिकेट ऍकॅडमीच्या मैदानात घुमत होता. पण शार्दुल ठाकूरने जम्मू-कश्मीरच्या गोलंदाजांना झुंज देत आणि ठोकत 7 बाद 101 अशा केविलवाण्या अवस्थेत असलेल्या मुंबईला सहीसलामत संकटातून बाहेर काढले. शार्दुल ठाकूर आणि तनुष कोटियन यांनी आठव्या विकेटसाठी 173 धावांची अभेद्य भागी रचत रणजी करंडक साखळी सामन्याच्या दुसऱया दिवसअखेर मुंबईला दुसऱया डावात 7 बाद 274 अशी आव्हानात्मक मजल मारून दिली. पहिल्या डावात 84 धावांची निर्णायक आघाडी घेणार्या जम्मू-कश्मीरने विजयाची नामी संधी गमावली असून मुंबईकडे सध्या 188 धावांची आघाडी आहे. मुंबईला बाद फेरीतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी जम्मू आणि कश्मीरला हरवावेच लागणार आहे. मुंबईसाठी हा पराभव बाद फेरीतील आव्हान खडतर करणारा ठरू शकतो तर जम्मू-कश्मीर मुंबईला नमवून थेट बाद फेरी गाठता येणार आहे.

गुरुवारी महत्त्वाच्या साखळी सामन्याच्या पहिल्या दिवशी जम्मू आणि कश्मीरने आपले वर्चस्व प्रस्थापित करताना बलाढ्य मुंबईला 120 धावांत गुंडाळले आणि त्यानंतर दिवसअखेर 7 बाद 174 अशी मजल मारत 54 धावांची आघाडीही मिळवली होती. मात्र आज त्या धावसंख्येत आणखी 32 धावांची भर घालून जम्मू आणि कश्मीरचा डाव आटोपला. मोहित अवस्थीने 52 धावांत 5 विकेट घेत पाहुण्यांना दुसऱया दिवशी फार काळ उभे राहू दिले नाही, मात्र यानंतरही जम्मू आणि कश्मीरकडे 86 धावांची निर्णायक आघाडी होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Marathi Fire (@marathifire)

…तर मुंबईचे द्वार उघडणार

रणजी करंडकाच्या दुसऱया टप्प्यात साखळीतील केवळ दोन सामने शिल्लक आहेत. मुंबईचा संघ सध्या 22 गुणांसह तिसऱया स्थानावर असून जम्मू आणि कश्मीरचा पराभव केल्यास मुंबईच्या बाद फेरीतील प्रवेशावर शिक्कामोर्तब होईल. मुंबईने विजय नोंदविल्यास तो 28 गुणांसह अ गटात अव्वल स्थान काबीज करेल. तसेच दुसऱया स्थानासाठी बडोदा आणि जम्मू आणि कश्मीर यांच्यात अखेरचा साखळी संघर्ष होणार असून जो जिंकेल तोच बाद फेरीतील आपले स्थान पक्के करील. त्याचप्रमाणे मुंबईचे आत्ताच बाद फेरीतील स्थान पक्के झाले तरी मेघालयविरुद्धही मोठा विजय मिळवून आपले अव्वल स्थान अधिक पक्के करण्याचीही संधी आहे.

ठाकूर-कोटियन संकटमोचक

पहिल्या डावातही मुंबईची 7 बाद 47 अशी भयावह अवस्था असताना शार्दुल ठाकूरने आक्रमक 51 धावा ठोकताना तनुष कोटिनयसह आठव्या विकेटसाठी 63 धावांची झुंजार भागी रचत मुंबईला शंभरी गाठून दिली होती. आजही तेच दोघे मुंबईसाठी संकटमोचक ठरले. शार्दुल-तनुषची जोडी फोडण्यासाठी पाहुण्यांच्या गोलंदाजांनी आपला सर्वोत्तम मारा केला, पण या दोन्ही अष्टपैलू खेळाडूंनी आपला झुंजार खेळ करत उपस्थित प्रेक्षकांना रणजी क्रिकेटचा अनोखा थरार दाखवला. शार्दुल ठाकूरने आपल्या प्रथम श्रेणी कारकीर्दीतील दुसरे शतक झळकावताना जिगरबाज खेळी केली. पन्नाशीतच 7 फलंदाज गमावल्यामुळे मुंबई दबावाखाली होती, पण शार्दुल जराही दबावाखाली दिसला नाही. त्याने आपल्या 119 धावांच्या खेळीत 17 चौकारांची बरसात करत नाबाद 113 धावा ठोकल्या होत्या. तनुषही तितकेच चेंडू खेळला, पण त्याने शार्दुलला साथ देत 58 धावांची अप्रतिम खेळी केली. रणजी सामन्यांच्या इतिहासात एकाच सामन्यात दोन्ही डावांत संघाची वाताहत झाली असताना त्याच जोडीने दोन्ही डाव सावरण्याचा दुर्मिळ पराक्रम केला.

मुंबईची पुन्हा घसरगुंडी

मुंबईच्या दुसऱया डावातही दिग्गजांनी माती खाल्ली. पहिल्या डावात 7 बाद 47 अशा दारुण अवस्थेत असलेल्या मुंबईला यशस्वी जैसवाल आणि रोहित शर्मा यांनी 54 धावांची सलामी दिली, पण दोघेही धावांची तिशीही ओलांडू शकले नाही. यशस्वीने 26 तर रोहितने 28 धावा ठोकताना 3 षटकारही खेचले. पण ही जोडी फुटताच हार्दिक तामोरे (1), अजिंक्य रहाणे (16), श्रेयस अय्यर (17), शिवम दुबे (0) आणि शम्स मुलानी (4) यांच्याही विकेट धडाधड काढत जम्मू आणि कश्मीरने विजयाच्या दिशेने कूच केले. 7 बाद 101 अशा बिकट अवस्थेत असलेल्या मुंबईकडे दुसऱया डावात 15 धावांची आघाडी होती. उर्वरित तीन विकेट घेत पाहुण्यांना बाद फेरीत सर्वप्रथम धडक मारण्याची संधी होती, मात्र सामन्याने कूस बदलली.