अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी मुंबई सज्ज, विदर्भविरुद्ध आजपासून उपांत्य सामना; सलामीवीर यशस्वी जैस्वाल सामन्याला मुकणार 

रणजी विजेता मुंबईचा संघ पुन्हा एकदा रणजी उपांत्य सामना जिंकण्यासाठी सज्ज झाला. सोमवारपासून जामठावर रंगणाऱ्या उपांत्य सामन्यात मुंबईच्या मार्गात विदर्भाचा अडथळा असेल. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर उभय संघ आमनेसामने येतील. सलामीवीर यशस्वी जैस्वाल दुखापतीमुळे या लढतीला मुकणार आहे.

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबईने सलग दुसऱ्यांदा उपांत्य फेरीत धडक मारताना उपांत्यपूर्व लढतीत हरयाणावर वर्चस्व गाजवले. अजिंक्यसह सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, शार्दुल ठाकूर असे आंतरराष्ट्रीय दर्जाचा अनुभव असलेले खेळाडू मुंबई संघाचा भाग आहेत. यशस्वी व दुबे यांचा चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी राखीव खेळाडूंत समावेश करण्यात आला आहे. हिंदुस्थानी संघाला गरज लागली तरच त्यांना दुबईत जावे लागणार आहे. त्यामुळे दोघेही रणजी स्पर्धेत खेळण्यासाठी उपलब्ध आहेत. मात्र सरावादरम्यान उजव्या गुडघ्याला दुखापत झाल्याने यशस्वी उपांत्य लढतीत खेळू शकणार नाही, असे समजते.

यशस्वीच्या अनुपस्थितीतही मुंबईकडे प्रतिभावान खेळाडूंचा भरणा आहे. सिद्धेश लाड, आयुष म्हात्रे यांच्यावर मुंबईच्या फलंदाजीची भिस्त आहे. सोबतीला अजिंक्य, सूर्यकुमार आहेतच. त्यानंतर शार्दुल, शम्स मुलाणी व तनुष कोटियन यांचे त्रिकूट दुहेरी योगदान देत असल्याने मुंबई प्रत्येक लढतीत दडपणातून सावरत आहे. गोलंदाजीत रॉयस्टन डायस व मोहित अवस्थी या वेगवान जोडीवर मुंबई विसंबून आहे.

विदर्भाचे नेतृत्व अक्षय वाडकर करत असून या संघांत करुण नायर, अक्षय वाखरे, यश राठोड असे प्रतिभावान खेळाडू आहेत. विदर्भ या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित आहे. मुंबई-विदर्भ यांच्यातच गेल्या वर्षी रणजीची अंतिम फेरी रंगली होती. त्यावेळी मुंबईने बाजी मारून 42 व्यांदा करंडक उंचावला. त्यामुळे यावेळी विदर्भाला परतफेड करण्याची संधी आहे. दुसरी उपांत्य लढत गुजरात आणि केरळ यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.

उभय संघ 

मुंबई अजिंक्य रहाणे (कर्णधार), आयुष म्हात्रे, अंक्रिश रघुवंशी, अमोघ भटकल, सूर्यकुमार यादव, सिद्धेश लाड, शिवम दुबे, आकाश आनंद, हार्दिक तामोरे, सूर्यांश शेडगे, शार्दुल ठाकूर, शम्स मुलाणी, तनुष कोटियन, मोहित अवस्थी, सिल्व्हेस्टर डिसोझा, रॉयस्टन डायस, अथर्व अंकोलेकर, हर्ष तन्ना.

विदर्भ अक्षय वाडकर (कर्णधार), अथर्व तायडे, अमन मोखाडे, यश राठोड, हर्ष दुबे, अक्षय कर्णेवार, यश कदम, अक्षय वाखरे, आदित्य ठाकरे, दर्शन नळकांडे, नचिकेत भुटे, सिद्धेश वाठ, यश ठाकूर, दानिश मलेवार, पार्थ रेखाडे, करुण नायर, ध्रुव शोरे.

वेळ – सकाळी 9.30 वा.

थेट प्रक्षेपण ः ‘जिओ हॉटस्टार ऍप’