जम्मू-कश्मीरचे मुंबईवर वर्चस्व, मुंबईच्या महारथींचा 120 धावांत खुर्दा

एक नव्हे तर सहा-सहा आंतरराष्ट्रीय कीर्तीचे क्रिकेटपटू असूनही मुंबईचा महारथी संघ पहिल्या डावात एकही आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू नसलेल्या जम्मू-कश्मीर संघापुढे अवघ्या 120 धावांत ढेपाळला आणि या नव्या दमाच्या संघाने पहिल्या डावात पहिल्या दिवसअखेर 7 बाद 172 अशी मजल मारत रणजी सामन्यात मुंबईवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले.

शार्दुल-तनुषची झुंज

पन्नाशीतच 7 फलंदाज बाद झाल्यामुळे बिकट अवस्थेत असलेल्या मुंबईला शार्दुल ठाकूर आणि तनुष कोटियनने सावरले. दोघांनी आठव्या विकेटसाठी 63 धावांची भागी रचत मुंबईला शंभरी ओलांडून दिली. दोघांची झुंज पाहून मुंबई संघालाही दिलासा मिळाला होता, पण उपाहारानंतर ही जोडी फार काळ टिकली नाही. ही जोडी फुटताच मुंबईचा डाव 120 धावांवर संपला. शार्दुल ठारकूने आपल्या 57 चेंडूंतील 5 चौकार आणि 2 षटकारानिशी ठोकलेली 51 धावांची खेळी सर्वात शेवटी संपली. जम्मू-कश्मीरच्या उमर आणि युधवीरने प्रत्येकी चार-चार विकेट टिपत मुंबईचा डाव 33 षटकांतच संपुष्टात आणला.

पाहुण्यांकडे 54 धावांची आघाडी

उमर-युधवीर यांच्या अप्रतिम गोलंदाजीनंतर शुभम खजुरिया (53) आणि अबीद मुश्ताक (44) यांनी मुंबईच्या गोलंदाजांचा यशस्वीपणे सामना करत जम्मू-कश्मीर संघाने पहिल्या दिवसअखेर 7 बाद 174 अशी मजल मारली. मोहित अवस्थीने 3 विकेट घेत प्रतिस्पर्ध्यांना जोरदार धडक दिली. तिसऱया आणि सहाव्या विकेटसाठी केलेल्या दोन अर्धशतकी भागींमुळे पाहुण्या संघाने 54 धावांची आघाडी घेत पहिल्या दिवसाच्या खेळावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले.

उमर-युधवीरसमोर मुंबईकर सपाट

12 धावांत सलामीची जोडी आटोपल्यावर मुंबईच्या डावाला कुणीच सावरू शकला नाही. उमर नझीरने भेदक मारा करत रोहितपाठोपाठ कर्णधार अजिंक्य रहाणे (12), शिवम दुबे (0) आणि हार्धिक तामोरेची (7) विकेट काढत मुंबईची 5 बाद 41 अशी केविलवाणी अवस्था केली होती. मग युधवीर सिंगने शम्स मुलानी (0) आणि श्रेयस अय्यर (11) यांना तंबूचा रस्ता दाखवत रणजी विजेत्या मुंबईची 7 बाद 47 अशी दारुण अवस्था केली.

रोहितच्या अपयशाचा पाढा सुरूच

मुंबईच्या वांद्रे-पुर्ला संपुलातील शरद पवार क्रिकेट अॅकेडमीच्या मैदानावर सुरू झालेल्या सामन्यात अजिंक्य रहाणेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेण्याचा निर्णय घेतला. तब्बल 13 वर्षांनंतर मुंबई रणजी संघात खेळत असलेला रोहित शर्मा आपला सलामीवीर जोडीदार यशस्वी जैसवालच्या साथीने मैदानात उतरला. कसोटीतील अपयशाने खचलेल्या रोहित आपला हरवलेला फॉर्म परत मिळवण्यासाठी रणजी क्रिकेटच्या मैदानात उतरला, पण इथेही त्याला आपले अपयश लपवता आले नाही. ऑस्ट्रेलियन मालिकेत केवळ 31 धावा करणारा रोहित 3 धावांवरच बाद झाला. यशस्वी जैसवालनेही घोर निराशा केली. तो तर सामन्याच्या तिसऱयाच षटकांत 4 धावांवर परतला. जम्मू-कश्मीरच्या गोलंदाजांनी 12 धावांतच मुंबईच्या दिग्गज सलामीच्या जोडीचे बारा वाजवले.