पहिल्या डावात 148 धावांच्या प्रचंड आघाडीनंतरही मुंबईला त्रिपुराविरुद्ध निर्णायक विजय मिळविण्यात अपयश आले. चौथ्या आणि शेवटच्या दिवशी आघाडीवीर घसरल्यामुळे मुंबईची तारांबळ उडाली आणि मुंबईनेच तीन तास किल्ला लढवत त्रिपुरासमोर 272 धावांचे आव्हान उभारत सामन्याचा निकालच फिरवला. त्रिपुराच्या सलामीवीरांनीच चहापानापर्यंत 48 धावांची अभेद्य सलामी देत सामना अनिर्णितावस्थेकडे झुकवला. त्यामुळे गेल्या सामन्यात विजय नोंदविणाऱया मुंबईने निर्णायक विजयाचा धोका टाळत पहिल्या डावातील आघाडीच्या 3 गुणांवरच समाधान मानले.
त्रिपुराविरुद्ध मोठी आघाडी घेतल्यानंतर मुंबईला आक्रमक खेळ करत 250-300 धावांचे आव्हान देऊन सामना रंगतदार करण्याची संधी होती. मात्र सोमवारी सलामीची जोडी 7 धावांतच बाद झाल्याने हादरलेल्या मुंबईला त्रिपुराच्या अभिजित सरकारने पुन्हा सकाळी धक्क्यांवर धक्के दिले. 44 धावांतच मुंबईचा अर्धा संघ माघारी परतल्यामुळे सामना जिंकण्याचा धोका मुंबईने टाळला आणि कर्णधार अजिंक्य रहाणेने सिद्धेश अधटरावच्या साथीने 64 धावांची भागी रचत सामना अनिर्णितावस्थेकडे नेण्यात धन्यता मानली. मुंबईने 6 बाद 123 धावांवर आपला दुसरा डाव घोषित करत त्रिपुरासमोर 272 धावांचे जबर आव्हान दिले. हे आव्हान कठीण असल्यामुळे त्रिपुराच्या बिक्रमकुमार दास आणि जीवनजोत सिंहने 22 षटके सावध फलंदाजी करत बिनबाद 48 धावा करत सामना अनिर्णित राखला. दोघांच्या कासवछाप खेळामुळे चहापानापर्यंत मुंबईला ही जोडी पह्डण्यात यश न मिळाल्यामुळे उभय संघांनी सामना अनिर्णित राखल्याचे मान्य करीत तेथेच खेळ थांबवला. पहिल्या डावात 59 धावांची खेळी आणि 65 धावांत 6 विकेट टिपणारा हिमांशु सिंग ‘सामनावीर’ ठरला. तो आपला दुसराच रणजी सामना खेळत होता.
तरीही त्रिपुरा मुंबईच्या पुढे
मुंबईला त्रिपुराला हरवून गुणतालिकेत 12 गुणांसह दुसरे स्थान काबीज करण्याची संधी होती. मात्र मुंबईने सामना जिंकण्याचा धोका न घेतल्यामुळे पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर 3 गुणांची कमाई करत 9 गुणांसह चौथे स्थान संपादले. तसेच त्रिपुराला आजच्या लढतीत एकच गुण मिळाला तरी ते तालिकेत 9 गुण आणि नेट रनरेटच्या आधारे मुंबईपेक्षा सरस आहेत. बडोद्याने सलग तीन विजयांसह 19 गुण मिळवत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. जम्मू 11 गुणांसह दुसऱया क्रमांकावर आहेत. अ गटात ओडिशा आणि मेघालय वगळता अन्य संघांना आपला विजय नोंदवता आलेला आहे. ‘ब’ गटात विदर्भनेही विजयाची हॅटट्रिक केली आहे तर गुजरात आणि राजस्थान हे दोन्ही संघ सध्या अपराजित आहेत.