रणजी विजयाच्या उंबरठ्यावर मुंबई; गायकवाड, बावणेच्या शतकानंतरही महाराष्ट्राचा दारुण पराभव निश्चित

रणजीविजेत्या मुंबईला रणजी मोसमाच्या सलामीच्याच लढतीत बडोद्याकडून पराभवाचे चटके सहन करावे लागले होते. मात्र महाराष्ट्रविरुद्धच्या सामन्यात पहिल्या डावात घेतलेल्या महाआघाडीमुळे सामन्यावर पकड मिळवली होती. महाराष्ट्राची पिछाडी भरून काढण्यासाठी आघाडीच्या सचिन धस, कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि अंकित बावणे यांनी जोरदार संघर्ष केला, पण पहिल्या डावातील दारुण कामगिरीमुळे त्यांना 315 धावांची पिछाडी भरून काढताना दुसऱ्या डावात 388 धावांपर्यंत मजल मारता आली. त्यामुळे मुंबइसमोर 74 धावांचे माफक लक्ष्य उरले असून त्यांना मोसमातील पहिल्या विजयासाठी केवळ 61 धावा करायच्या आहेत. तिसऱ्या दिवसअखेर मुंबई बिनबाद 13 धावा केल्या होत्या.

पहिल्या डावात महाराष्ट्राचा डाव 126 धावांत गुंडाळत आयुष म्हात्रे आणि श्रेयस अय्यरच्या जबरदस्त शतकी खेळीच्या जोरावर मुंबईने 441 धावा ठोकल्या आणि 315 धावांची आघाडी घेत आपली रणजी सामन्यावर पकड मजबूत केली होती. महाराष्ट्राने दुसऱ्या डावात जोरदार संघर्ष केला. शनिवारच्या 1 बाद 142 वरून पुढे खेळताना सचिन धस आणि ऋतुराज गायकवाड यांनी 222 धावांची भागी रचली. गायकवाडने शतक झळकावले, पण सचिनला केवळ 2 धावा कमी पडल्या. तो 98 धावांवर बाद झाला. त्यानंतर गायकवाडची तडाखेबंद खेळी 145 धावांवर संपली. त्यानंतर महाराष्ट्राच्या डावाला अंकित बावणेच्या खेळीने सावरले.

ऋतुराज बाद होताच अझिम काझी (7), नितीन नाईक (5), अर्शिन कुलकर्णी (0) हे लवकर बाद झाल्यामुळे महाराष्ट्राची 6 बाद 295 अशी घसरगुंडी उडाली. मग अंकित बावणेने सत्यजीत बच्छावच्या मदतीने 88 धावांची भागी रचत संघाची पिछाडी भरून घातली आणि संघाचा डावाचा पराभवही टाळला. अंकित आज आपले 24 वे प्रथम श्रेणी शतक साकारले, पण तो बाद होताच अवघ्या पाच धावांत त्यांचे उर्वरित तीन फलंदाजही बाद झाले. 6 बाद 283 वरून 288 वर महाराष्ट्राचा दुसरा डावही आटोपला आणि मुंबईला विजयासाठी 74 धावांचे माफक लक्ष्य उरले.

धस, गायकवाड आणि बावणेच्या आक्रमक खेळीने महाराष्ट्राच्या डावात जीव आणला होता, पण अन्य फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे ते मुंबईसमोर आव्हानात्मक धावसंख्या उभारू शकले नाहीत. मुंबईच्या मोहित अवस्थीसह शम्स मुलानी आणि तनुष कोटियनच्या फिरकीनेही कमाल दाखवत प्रत्येकी तीन-तीन विकेट टिपल्या.