Ranji Trophy मुंबईला 148 धावांची आघाडी, सामना निर्णायक वळणावर नेण्याची मुंबईला संधी

जीवनजोत सिंहच्या 118 धावांच्या खेळीनंतर तसेच श्रीदम पॉल आणि कर्णधार मनदीप सिंह यांच्या अर्धशतकी खेळीनंतरही मुंबईच्या हिमांशु सिंगने 65 धावांत 6 विकेट टिपत त्रिपुराचा पहिला डाव 302 धावांत गुंडाळला आणि 148 धावांची दणदणीत आघाडी घेतली. मात्र या आघाडीनंतर सलामीवीर अंगक्रिष रघुवंशी (6) आणि आयुष म्हात्रे (1) हे दोघेही 7 धावांत परतल्यामुळे मुंबईची तिसऱया दिवसअखेर 2 बाद 7 अशी अवस्था झाली. मुंबईला निर्णायक विजय मिळवण्यासाठी मंगळवारी अखेरच्या दिवशी पहिल्या सत्रात वेगात धावा फटकावून त्रिपुरासमोर दमदार आव्हान उभारावे लागेल आणि त्रिपुरा या धावांचा पाठलाग करून सामना निर्णायक करण्यासाठी प्रयत्न करेल.

काल मुंबईने पहिल्या डावात 450 धावांची मजल मारल्यानंतर त्रिपुरा फलंदाजीला आली होती आणि दुसऱया दिवसअखेर 1 बाद 60 अशी दमदार सुरुवातही केली होती. मात्र आज सकाळी जीवनजोत सिंहला परवेज सुल्तान (6), तेजस्वी जैसवाल (4) यांची साथ लाभली नाही. पण त्यानंतर जीवनजोतने श्रीदम पॉलबरोबर 91 धावांची भागी रचत संघाला सावरले. जीवनजोतने आपल्या प्रथमश्रेणी कारकीर्दीतील 14 वे शतक झळकवत त्रिपुराला सावरण्याचा प्रयत्न केला. तो बाद झाल्यावर त्रिपुराची पुन्हा घसरगुंडी उडाली. काही काळ पॉल आणि मनदीप सिंहने डाव सावरला. मात्र त्यानंतर ठरावीक अंतराने हिमांशुने त्रिपुराच्या डावाला एकामागोमाग हादरे देणे कायम ठेवत 6 विकेट टिपण्याची कामगिरी केली. बडोद्याविरुद्ध रणजी पदार्पण करणाऱया हिमांशुचा हा दुसराच सामना होता आणि त्याने आपली सर्वोत्तम कामगिरी केली. त्याच्या फिरकीमुळेच कर्णधार मनदीपच्या झुंजार खेळानंतरही त्रिपुराचा डाव 302 धावांवर संपला आणि मुंबईला 148 धावांची आघाडी मिळवता आली.

सामना निर्णायक करण्यासाठी…

मुंबईने पहिल्या डावातील आघाडीचे गुण मिळवलेच आहेत. आता निर्णायक विजयाचे गुण मिळवत गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवण्याची मुंबईला नामी संधी आहे. मात्र यासाठी चौथ्या दिवशी पहिल्या सत्रात आपली आघाडी 250 ते 275 धावांपर्यंत नेत उर्वरित दोन सत्रांत त्रिपुराला सामना निकाली काढण्याचे आव्हान देता येऊ शकते. त्रिपुराने पहिल्या डावातील आघाडी गमावल्यामुळे त्यांनी विजयासाठी प्रयत्न केल्यास ते 6 गुणांची कमाईसुद्धा करू शकतात. सामना निर्णायक वळणावर नेण्यासाठी मुंबईचा आक्रमक आणि धाडसी खेळच महत्त्वाचा आहे. पण मुंबईचे खेळाडू किती धोका पत्करतात, ते उद्या सकाळीच कळू शकेल.

बडोद्याची विजयी हॅट्ट्रिक

रणजी विजेत्या मुंबईला पहिल्याच सामन्यात धक्का देणाऱ्या बडोद्याने आपले विजयी अभियान कायम राखताना ओदिशाचा डाव आणि 98 धावांनी दणदणीत पराभव करत आपल्या विजयाची हॅट्ट्रिक साधली. तसेच या सामन्यात बोनस गुणाची कमाई करत गुणतालिकेत 19 गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे.

बडोद्याने आपल्या पहिल्या लढतीत मुंबईचा 84 धावांनी पराभव केला होता, तर सेनादलाविरुद्धच्या सामन्यात 65 धावांनी विजय मिळवत आपले विजयी अभियान कायम राखले होते. आज तर त्यांनी ओदिशाचा दुसरा डाव 165 धावांत गुंडाळत आपल्या हॅट्ट्रिकवर शिक्कामोर्तब केले. निनाद राठवाने 60 धावांत 6 विकेट टिपत बडोद्याला तिसऱयाच दिवशी विजय मिळवून दिला. राठवाला पहिल्या डावात एकही विकेट टिपता आला नव्हता. ओदिशाचा पहिला डाव 193 धावात आटोपल्यानंतर बडोद्याने कर्णधार कृणाल पंडय़ाच्या तडाखेबंद 118 आणि विष्णू सोलंकीच्या संयमी 98 धावांच्या जोरावर 456 धावांचा डोंगर उभारत बडोद्याला 263 धावांची प्रचंड आघाडी मिळवून दिली होती. कर्णधार पंडय़ाच विजयाचा शिल्पकार ठरला.